शिरूर, ४ एप्रिल २०२३: सध्या दैनंदिन वस्तू खरेदीसाठी यूपीआय पेमेंटला प्राधान्य दिले जात आहे. या अॅपला स्कॅनरची गरज असते. सध्या दुकानांमधील स्कॅनर प्लॅस्टिकमध्ये बसवलेले असते. ते लवकर खराब होत असल्याने शिरुरमधील एका तरुणाने लाकडी स्कॅनर बनवले आहे. दिग्विजय मोरबाळे असे या तरुणाचे नाव आहे. सध्या प्रत्येक दुकानात प्लास्टिक स्कॅनर बसवलेले असते. मात्र ते वापरुन लवकर खराब होते.
हे पाहून दिग्विजय मोरबाळे यांच्या मनात याच स्कॅनरला लाकडात बनवून त्यांच्यावर दुकानाचे नाव, लोगो, बारकोड, मोबाईल नंबर आणि इमेल आयडी कोरीव काम करून बसवायचा विचार आला. डिसेंबर २०२१ मध्ये त्यांनी बारकोडचे डिझाईन बनवयाला सुरुवात केली. बारकोडची डिझाईन खुप नाजूक आणि वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे खूप अडचणी आल्या. पण जिद्दीने अडचणीवर मात करून स्कॅनर बनवले.
अथक परिश्रमातून दीपांजली वुड आर्ट नावाचा पहिला लाकडी स्कॅनर बनवले आहे. यानंतर शिरूरमधील लाकडी वस्तूंच्या प्रदर्शनात तो विक्रीसाठी ठेवला. तो लोकांनाही खूप आवडला. शिरूरमधील काही जुन्या हॉटेलची ऑर्डर मिळाली. तेथेही हे स्कॅनर ग्राहकांना आवडले. मागणी वाढून आतापर्यंत जवळपास १०० लाकडी स्कॅनर बनवून दिल्याची माहिती दिग्विजय मोरबाळे या तरुणाने दिली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर