मीही एक पुस्तक लिहिणार – प्रफुल्ल पटेल

4

वांद्रे, ५ जुलै २०२३ : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. आज त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटताना दिसतायत. आजच्या दिवशी एकीकडे अजित पवार गट तर दुसरीकडे शरद पवार गट असे दोन गट निर्माण झाले आहे. या दोन्ही गटाची एकाच वेळी बैठक आयोजित करण्यात आलीय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार वायबी सेंटर येथून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत तर अजित पवार वांद्रे येथे मार्गदर्शन करत आहेत

अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्यावर एनसीपी पक्षातले अनेक निकटवर्तीय नेते त्यांच्याबरोबर गेले आहेत. विशेष बाब म्हणजे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल हेदेखील अजित पवारांबरोबर गेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज त्यांच्या समर्थक आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या नियोजित बैठकीत बोलताना शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची साथ कशी काय सोडली? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या प्रसंगा वर आज स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी भाष्य केलं. तसेच त्यांनी शरद पवारांकडे पाठिंबादेखील मागितला आहे.

यावेळी प्रफुल्ल पटेल बोलले की, मी एक सौम्य व्यक्ती आहे, त्यामुळे मी खूप कमी बोलतो. कारण कमीच बोललेलं बरं. मलाही एक दिवस माझं पुस्तक लिहायचं आहे, आणि पुस्तक लिहिण्याची वेळ येणार आहे. हे पुस्तक जेव्हा मी लिहिणार, त्याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाला काय काय समजेल हे मला सांगायची आत्ता तरी गरज नाही, किमान आज तरी तशी इच्छा नाही.

या वक्तव्याद्वारे प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे इशारा दिला असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान पुढे पटेल म्हणाले, शरद पवार साहेब यांच्यासोबत असणारा साहेबांची सावली असणारा मी या मंचावर, अजित दादा सोबत आहे, यांच्याबरोबर उभा आहे. यात जो इशारा आहे तो तुम्हाला समजला पाहिजे.

तसेच प्रफुल्ल पटेल म्हणाले, मी या मंचावर का आणि त्या मंचावर का नाही? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. संपूर्ण देश आणि महाराष्ट्र या प्रश्नाचं उत्तर शोधतोय. पंरतु याचं उत्तर मी तुम्हाला योग्य वेळ आल्यावर देईल, पण आज देणार नाही. तुम्हाला आवश्यक असलेला खुलासा मी करणार आहे. आज धनंजय मुंडे , छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी त्याचे संकेत दिलेत आणि मी ही यावर सविस्तर बोलेन. त्यावर आपण पुढे कधी ना कधी नक्कीच चर्चा करणार आहोत आणि तुम्हाला तुमचं उत्तर मिळणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा