अजितदादासह नऊ मंत्र्यांनी मागितली शरद पवार यांची माफी, सर्व लोक एकत्र आले तर मला आनंदच होईल,जयंत पाटील यांचे वक्तव्य

मुंबई, १६ जुलै २०२३ : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. शरद पवार यांना पूर्व कल्पना न देता, त्यांची कोणतीही वेळ न घेता राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. तब्बल तासभर ही भेट झाली. या नेत्यांनी शरद पवार यांना काही विनंती केली. पण शरद पवार यांनी त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. यावेळी सर्वच मंत्र्यांनी शरद पवार यांच्या पाया पडून दर्शन घेतले. आम्ही चुकलो असे सांगत माफीही मागितल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादीच्या मंत्र्यानी शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर या नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि भेटीची माहिती दिली. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही या भेटीची माहिती दिली. राष्ट्रवादीतून फुटून सत्ताधाऱ्यांच्या बाजूने गेलेला एक गट शरद पवार यांच्या भेटीला आला होता. त्यांनी शरद पवार यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली. माफी मागितली. मार्ग काढण्याची विनंती केली. त्यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. हे सर्व नेते अचानक भेटायला आले होते. नंतर मला बोलावले, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

या आमदारांनी शरद पवार यांना भेटणे ही अनपेक्षित घटना आहे. त्याचा आम्ही कधीच विचार केला नव्हता. त्यावर बोलणे योग्य नाही. शरद पवार यांच्यासोबत आम्ही बसू तेव्हा चर्चा करू, असे जयंत पाटील म्हणाले. ते अचानक भेटले आहेत. त्यातून त्यांचा काय उद्देश आहे. हे आज सांगणे कठीण आहे. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. खंत व्यक्त केली. तुम्ही मार्गदर्शन करावे असे म्हणाले. गुंता सोडवण्यास सांगितले. पण शरद पवार यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले तर तुमची काय प्रतिक्रिया असेल? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर सर्व लोक एकत्र आले तर पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मला आनंदच होईल, असे पाटील म्हणाले.विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. आमची काँग्रेसशी चर्चा झाली आहे. ठाकरे गटाशीही चर्चा झाली आहे. आमच्याकडे संख्याबळ नसताना विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणे योग्य नाही. कागदावर आमचाच पक्ष मोठा आहे. कारण सोडून गेलेल्यांनी पक्ष सोडल्याचे म्हटलेले नाही. पण तरीही विरोधी पक्षनेतेपदावर आम्ही दावा करणार नाही. आमच्याकडे सध्या १९ ते २० आमदार आहेत, असे पाटील यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा