आरमोरी, २५ जुलै २०२३ : सरकारने शेतकऱ्यांसाठी १ रुपये दराने प्रधानमंत्री फसल विमा योजना सुरू केली आहे. त्यामुळे पिकांचा विमा मोठ्या प्रमाणात शेतकरी उतरवत आहेत. पण २१ जुलैपासून पीक विमा योजनेचे पोर्टल बंद केल्याने, शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे सदर पोर्टल लवकरात लवकर सुरू करून पीक विमा योजनेची मुदत वाढवून देण्याची मागणी, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी केली आहे.
नैसर्गिक आपत्ती व इतर कारणांमुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटाने घेरला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी शासनाने ‘पंत प्रधान पीक विमा योजना’ सुरू केली आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम भरावी लागत होती. परंतु यावर्षी पीक विमा रु.१ करण्यात आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी केली असून, या पिकांना संरक्षण मिळावे, यासाठी ते पीक विमा काढत आहेत.
३१ जुलै ही पीक विमा काढण्याची शेवटची तारीख असल्याने शेतकरी लवकरच पीक विमा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु २१ जुलैपासून प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे ऑनलाइन पोर्टल बंद झाल्याने, आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा, पळसगाव, पाथरगोटा, शंकरनगर, रामपूर कासवी, आष्टा आदी गावातील शेतकरी फसल विमा योजनेपासून वंचित आहेत.
शेतकऱ्यांना पीक विमा घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पीक विमा योजनेच्या नोंदणीची मुदत सुरू करण्याची मागणी केली आहे. निवेदन देताना हरिदास बावणे, मोरेश्वर मेत्राम, सोपान गेडाम, लालाजी मेत्राम, धोडू तोडरे, मुखरू उरकुडे, कितीलाल गरफाडे, गुरुदेव राऊत, केशव खरकाटे, प्रदिप सदमाके, खुशाल ठाकरे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड