शिर्डी, २३ ऑगस्ट २०२३ : शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आज शिवसेनेच्या ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला आहे. वाकचौरे यांच्यासह त्यांचे असंख्य कार्यकर्तेही ठाकरे गटात सामील झाले आहेत. भाऊसाहेब वाकचौरे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात म्हणजेच शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. या प्रवेशावेळी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आणि ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी वाकचौरे यांनी हाती शिवबंधन बांधलं. शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर वाकचौरे हे काँग्रेस, भाजप असा प्रवास करून पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत परतले आहेत.
माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरे यांनी एक छोटे भाषण केलं. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात चमत्कार घडतोय. हाच चमत्कार आता देशात घडणार आहे. चार-पाच दिवसांपूर्वी भाऊसाहेब मला भेटले. त्यांनी मला सांगितलं की मी चूक केली, त्यामुळे मी तुमची आणि मातोश्रीची माफी मागतो. मी त्यांना म्हटलं, भाऊसाहेब, माझी माफी मागितली नाही तरी चालेल, परंतु, माझ्या शिवसैनिकांची माफी मागा.
पूर्वीचा कोपरगाव आणि त्यानंतर शिर्डी लोकसभा नामांतर झालेला शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच लढत पाहायला मिळाली. २००९ साली शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. राखीव मतदारसंघात शिवसेनेकडून उमेदवारी मिळवत भाऊसाहेब वाकचौरे यांनी विजय मिळवला. २००९ साली काँग्रेस आघाडीचे रामदास आठवले यांचा पराभव करत वाकचौरे खासदार झाले. मात्र २०१४ साली शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेच शिवबंधन तोडून शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र काँग्रेसमध्ये उमेदवारी घेतल्यानंतर त्यांना पराभव स्वीकारावा लागला. अचानक उमेदवारी मिळाल्याने अवघी १७ दिवस प्रचार करत शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांचा पराभव केला.
शिवसेना व काँग्रेस असा प्रवास केलेले भाऊसाहेब वाकचौरे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये रमले नाहीत आणि अवघ्या वर्षभरातच त्यांनी भाजपात प्रवेश केला. २०१४ साली स्वबळावर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाऊसाहेब वाकचौरे यांनी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी घेत निवडणूक लढवली. मात्र त्या ठिकाणीही वाकचौरे यांना अपयशाला सामोर जावं लागलं. २०१४ पासून भाजपात असलेले भाऊसाहेब वाकचौरे यांनी २०१९ च्या लोकसभेत अपक्ष उमेदवारी केली मात्र त्यात त्यांचे डिपॉझिट सुद्धा जप्त झाले. आगामी २०२४ च्या दृष्टीने पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा स्वगृही परतले असून आज त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे