मुंबई, २९ ऑगस्ट २०२३ : अप्पर वर्धा कृती समितीच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मंत्रालयात आक्रमक भूमिका घेतली आहे. अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मंत्रालयात जाळीवर बसून आंदोलन सुरु केले असून पोलिसांकडून या आंदोलनकर्त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु आहे.
अप्पर वर्धा धरणग्रस्तांनी मंत्रालयात सुरक्षाजाळीवर उड्या मारत आंदोलन केले. १०५ दिवसांपासून आम्ही आंदोलनाला बसलो आहेत, आमची कोणीही दखल घेतली नाही. सरकार आपल्या दारी म्हणता आज आम्ही सरकारच्या दारी आलो आहोत असे या आंदोलकांचे म्हणणे आहे. धरण प्रकल्पात आमच्या जमिनी गेल्या. आम्हाला मोबदला देऊ, सरकारी नोकरी देऊ अशी आश्वासने देण्यात आली. मात्र आजपर्यंत एकही आश्वासन पूर्ण झाले नाही, असे या आंदोलकांचे म्हणणे आहे. मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास या प्रकल्पग्रस्तांनी मंत्रालयातील सुरक्षाजाळीवर उड्या मारल्या. पोलिसांनी बऱ्याच प्रयत्नांनंतर या आंदोलकांना जाळीवरून बाजूला हटवले. यावेळी मंत्री दादा भुसे तिथे पोहोचले व त्यांनी आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला.
मंत्रालयामध्ये आज सकाळपासूनच एक मेडिकल कॅम्प सुरू होता. यावेळी अनेक शेतकरी उपस्थित होते. पण अचानक काही शेतकऱ्यांनी मंत्रालयाच्या जाळीवर धाव घेतली. त्यानंतर मंत्रालयात एकच खळबळ माजली. त्यानंतर या आंदोलकांनी त्यांची सर्व परिपत्रकं खाली फेकण्यास सुरुवात केली. दरम्यान आमच्या मागण्यांकडे कोणी लक्ष देत नसल्यामुळे आम्ही हा आक्रमक पवित्रा घेतला असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यावेळी मंत्रालयात उपस्थित असल्याची माहिती देखील समोर येत आहे. त्यामुळे त्याचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही हा आक्रमक पवित्रा घेतला असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे.
आम्ही ज्या मागण्या करत आहोत, त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मुलांना सरकारी नोकऱ्या मिळवून द्याव्यात अशी देखील मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. पोलिसांनी या शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं असून यावर आता राज्यसरकार कोणती भूमिका घेतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे