पुणे, ८ सप्टेंबर २०२३ : राज्य सरकारने केंद्राशी बोलून आरक्षणाची टक्केवारी वाढवली पाहिजे. इतर राज्यात जे झालं आहे, त्यावर सरकारने विचार करावा असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. “जे शिवसेनेच्या बाबतीत घडलं तसं राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत घडलं, तर त्यात वावग नाही, आमच नाव, चिन्ह जाईल अस वाटतंय. दुसऱ्याना ते देऊन परत शिवसेनेसारखी स्थिती निर्माण होऊ शकते” असं जयंत पाटील म्हणाले. सागर बंगल्यावरचा बॉस कधी भेटला, तर आम्ही नक्की विचारू महाराष्ट्रात असे किती सोडलेत? असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
अजित पवार यांच्या बंडमुळे राष्ट्रवादीत २ उभे गट पडलेत. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आमदारांचा एक मोठा गट असल्याचा दावा केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी उपरोक्त विधान केले आहे. शिवसेनेतील बंडाळीनंतर त्यांचे पक्ष व निवडणूक चिन्ह बंडखोर गटाला मिळाले. जे शिवसेनेसोबत घडले, तेच राष्ट्रवादी काँग्रेससोबत घडले तर नवल नाही. आमचे नाव व चिन्ह जाईल असे वाटत आहे. ते दुसऱ्यांना देऊन पुन्हा शिवसेनेसारखी स्थिती निर्माण केली जाऊ शकते, असे जयंत पाटील म्हणाले.
यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू असणाऱ्या आंदोलनावरही भाष्य केले. राज्य सरकारने केंद्राशी बोलून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा वाढवावी. इतर राज्यांत जे झाले, त्यावर सरकारने विचार करावा. पण हे सरकार गोंधळलेले आहे. ते केवळ समित्या नेमून वेळ काढत आहे, मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश कुणी दिले? हे शोधणारी यंत्रणा आमच्याकडे नाही. आम्हाला शंका आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांना लाठीचार्जची कल्पना नसेल किंवा पोलिस सरकारचे ऐकत नसतील, तर सरकारला काय अर्थ आहे? ही एक नियंत्रण नसणारी फोर्स आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर आज धनगर आंदोलकांनी भंडारा उधळला. त्यावर जयंत पाटील म्हणाले की, एखाद्या मंत्र्यांवर अशा पद्धतीने काही फेकणे चुकीचे आहे, ते एका राज्याचे मंत्री आहेत. शिष्टमंडळानेही त्यांचं मत मांडलं पाहिजे होतं. असं जर होत असेल तर कुठलाही मंत्री ऐकून घ्यायला तयार होणार नाही. जयंत पाटील यांनी जगन्नाथ शेवाळे यांची पुणे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे