नागपूर, २३ फेब्रुवारी २०२४ : नागपूरचा युवा संगीतकार व गीतकार श्रेयस पुराणिकला नुकतेच दोन प्रतिष्ठित फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त झाले आहेत. गुजरात मधील अहमदाबाद येथे झालेल्या फिल्मफेअरच्या शानदार समारंभात श्रेयसला आर. डी. बर्मन अपकमिंग म्युझिक टॅलेंट २०२४ पुरस्कारासह हिंदी चित्रपट ‘ऍनिमल’ मधील ब्लॉकबस्टर ‘सतरंगा’ गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारांसाठी श्रेयसचे बॉलीवूड आणि संगीत क्षेत्रात कौतुक होत आहे.
३१ वर्षीय श्रेयसचा जन्म नागपूरचा असून तो प्रशांत पुराणिक आणि शुभा पुराणिक यांचा मुलगा आहे. सोमलवार निकालसमधून त्याचे प्राथमिक शिक्षण झाले आहे. नंतर तो दिग्गज गायक सुरेश वाडकर यांच्याकडून संगीताचे औपचारिक प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबई गेला. संगीताची लहापणापासून आवड असलेल्या श्रेयसने वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच गायला सुरूवात केली होती.
श्रेयस म्हणतो, संगीत ही माझी आवड आहे आणि मला श्रोत्यांना आवडणारे संगीत एक्सप्लोर करण्यासाठी प्रयोग करणे आवडते. बॉलीवूड चित्रपट अॅनिमलसाठी ब्लॉकबस्टर् गाणे बनवण्याचा आणि फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त करण्याचा अनुभव सांगण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत तो बोलत होता. ‘महान दिग्गज संगीतकार आर.डी. बर्मन यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हा खरोखरच मोठा सन्मान आहे. हा पुरस्कार मला भविष्यात आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा देईल,’ असे श्रेयस पुढे म्हणाला, श्रेयसने ऍनिमलचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा आणि ‘ऍनिमल’च्या टीमचेही आभार मानले.
श्रेयसचा आतापर्यंतचा बॉलीवुड संगीत प्रवास अतिशय रोमांचक आणि विविधतेने नटलेला राहिला आहे. २०१५ च्या ‘बाजीराव मस्तानी’ या हिंदी चित्रपटासाठी संजय लीला भन्साळी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणून करीयरला सुरुवात करणाऱ्या श्रेयसने या चित्रपटासाठी ‘गजानना’ आणि ‘अब तोहे जाने ना दूंगी’ या गाण्यांना संगीत दिले होते. याशिवाय, पायल देवसोबत ‘अब तोहे जाने ना दूंगी’ हे गाणेही गायले. पुढे, त्याने भन्साळींसोबत २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पद्मावत’ आणि २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या हिंदी चित्रपटांसाठी काम केले. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फोटोकॉपी’, ‘लपाछपी’ आणि २०१७ च्या ‘फास्टर फेणे’, या मराठी चित्रपटांसाठी त्याने संगीतकार म्हणून काम पहिले. २०१९ मध्ये, त्याने ‘मलाल’ या हिंदी चित्रपटातील ‘नाद खुळा’ गाण्यासाठी गायक आणि संगीतकार म्हणून काम केले. याच चित्रपटातील ‘आयला रे’ या गाण्यात त्याने ‘रॅप’ देखील केले. त्याने हिंदी लघुपट ‘बुद्ध’ (अवेकिंग) साठी संगीतकार म्हणूनही काम केले आहे. २०२३ मध्ये त्याने ‘ऍनिमल’ या हिंदी चित्रपटातील ‘सतरंगा’ गाण्यासाठी संगीत दिले. हे गाणे अरिजित सिंगने गायले होते. त्याने २०१९ मध्ये राहुल वैद्यसाठी ‘याद तेरी’, २०२२ मध्ये श्रेया घोषाल सोबत ‘उफ’ आणि मध्ये सोनू निगम सोबत ‘शिव शंकरा’ (२०१९) आणि ‘अवध में लौटे है श्री राम’ (२०२४) असे अनेक सिंगल्स आणि हिंदी संगीत व्हिडिओ तयार केले आहेत. या गीतांना सोशल मीडियावर उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
न्युज अनकट प्रतिनीधी : नीता सोनवणे