जळगाव २१ मार्च २०२४ : जळगाव महापालिकेत आयुक्त व प्रशासक म्हणून काम करताना नागरिकांच्या व कर्मचाऱ्यांच्या अपेक्ष्ाा पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला असल्याचे मत महापालिकेच्या मावळत्या आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायवाड यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ. विद्या गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळत असताना पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, माजी महापौर, नगरसेवक ,सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे देखील सहकार्य लाभले.
नागरिकांच्या सेवांना प्राधान्य-
कार्यभार सांभाळत असताना सामान्य नागरिकांच्या मूलभूत सुविधा मिळविण्यासाठीच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणावर होत्या, चांगले रस्ते, नाली, स्वच्छ पाणी, विद्युत व्यवस्था या कामांना शासनामार्फत प्राप्त निधी तसेच मनपाच्या अर्थसंकल्पातील तरतुदीचा पूर्णपणे उपयोग करून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्याचाच परिणाम म्हणून शहरात चांगला बदल घडून आला व तशी सामान्य नागरिकांची प्रतिक्रिया देखील प्राप्त झाली आहे. सर्वच कामांच्या निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्याकडे कटाक्षाने लक्ष देऊन कोणत्याही दबावाला बळी न पडता स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्याने अनेक कामे अंदाजित रकमेपेक्षा कमी दराने प्राप्त झाल्याने मनपाचा कोट्यावधीची बचत झाली आहे. ही रक्कम इतर विकास कामांसाठी उपयोगात आणणे शक्य झाले.
५० वर्षाचा विचार करून नियोजन-
शहराचा पुढील ५० वर्षाचा विचार करून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या घनकचरा प्रकल्पाच्या कामाची सुरुवात करता आली याचे मला विशेष समाधान वाटते. शासनाचा निधीचा शहरासाठी पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी प्रयत्न करून निधीचा विनियोग केला आहे. शहराच्या सौंदंर्यीकरणात भर घालण्याच्या दृष्टीने देखील अनेक उपक्रम सुरू केले आहे. शहरातील उड्डाणपुलाच्या पोलवर विद्युत रोषणाई करणे, सिग्नल व्यवस्था नव्याने बसविणे, पार्किंगसाठी पिवळे पट्टे मारणे, रोड साईडच्या जागेत ब्लॉक बसविणे, वृक्षारोपण व संगोपन करण्यात आले आहे. याशिवाय इतरही उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे.
पीएम इ बसेस-
विशेष बाब म्हणून शहरात ५० इ बसेस सुरू करण्यासाठी शासनास शासन स्तरावरून मान्यता प्राप्त करून निधी मंजुरी घेऊन निविदा प्रक्रिया राबविली आहे. लवकरच जळगावकरांना ई-बस सुविधा प्राप्त होणार आहे. रामदास कॉलनीतील उद्यान विकसित करण्यासाठी शासन निधीतून निविदा प्रसिद्ध केली असून शहरवासीयांना नवीन व सुंदर उद्यानाचा लाभ होणार आहे. शहरातील रस्त्यांची कामे गतीने सुरू आहेत, अमृत योजनेचे काम देखील पूर्णत्वाकडे आलेले आहे, कर्मचाऱ्यांसाठी देखील काम करता आले याचे समाधान आहे. ७वे वेतन आयोग लागू करणे, अनुकंपा भरती करणे, लेखापरीक्षणात कर्मचारी वर्गातील आक्षेपांचे निराकरण करणे, नवीन भरतीसाठी देखील शासन दरबारी पाठपुरावा केला. सेवा प्रवेश नियमावली मान्यतेसाठी सादर करण्यात आली असून लवकरच मार्गी लागणार आहे.
जळगाव शहरातील नागरिकांची देखील मला सहकार्य केले नागरिकांनी देखील सहकार्य केले व त्यांच्या सहकार्याने आशीर्वादाने मी अनेक कामे मार्गी लावू शकले व थोड्या प्रमाणात का होईना पण त्यांचे समाधान करू शकले याचे मला मनस्वी समाधान वाटत असल्याचेही त्या म्हणाल्या. शासनाच्या बदलीच्या आदेशानुसार आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड यांनी बुधवार,२० रोजी दुपारी ३ वाजता अतिरिक्त आयुक्त पल्लवी भागवत यांच्याकडे कार्यभार सोपवला. दुपारी तीन वाजता अतिरिक्त आयुक्त पल्लवी भागवत यांना आयुक्तांच्या दालनात मावळत्या आयुक्त डॉ. गायकवाड यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांच्याकडे पदभार दिला. पदभार दिल्यानंतर त्यांना मावळत्या आयुक्त डॉ. गायकवाड यांनी आयुक्तपदाच्या खुर्चीवर बसवून त्यांची अभिनंदन केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : पंकज पाटील