रेडिओ आणि त्याच्या आठवणी….

50

आज प्रगत झालेल्या टेक्नॉलॉजीच्या काळात सर्वांच्या खिशात स्मार्ट फोन असणार्‍या जमान्यात रेडिओची कोणाला आठवणही होत नसावी बहुधा. आज प्रत्येकाच्या घरात मोठे-मोठे टीव्ही आणि फोनमध्ये यूट्यूब आणि नेटफ्लिक्स आहे. शहरात डझनभर मुव्ही थिएटर अशी कितीतरी मनोरंजनाची साधन उपलब्ध असताना मागच्या पिढीची रेडिओ ऐकण्यासाठी एरिअल ओढून फ्रिक्वेन्सी सेट करूण गाणी ऐकण्याची धडपड आजच्या पिढिला समजणार नाही.

भारतात रेडिओची सुरूवात १९२३ साली रेडिओ क्लबमध्ये झाली. १९३६ साली त्याला ऑल इंडिया रेडिओ हे नाव मिळालं. भारत स्वातंत्र्य झाला. तेव्हा देशात केवळ सहाच रेडिओ स्टेशन्स होते. प्रसिद्ध हिंदी कवी पंडित नरेंद्र शर्मा यांनी सुचवलेले आकाशवाणी हे नाव १९५७ साली अधिकृतपणे जाहिर करण्यात आले.

रेडिओतील बदलाबरोबरच रेडिओ संचातही अनेक बदल झाले. लाकडाच्या कॅबिनेटच्या आकाराचे रेडिओ सेट झाले. तसेच १९५४ साली लहान रेडिओ सेट म्हणजे ट्रान्झिस्टरचा उदय झाला. जे की फार महाग होते. बदलत्या काळात रेडिओ क्रिकेटची काँमेंट्री ऐकायला वापरले जाऊ लागले. वॉकमन, आयपॉड आणि आता रेडिओ मोबाईलमध्येच उपलब्ध झाला आहे.

स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वच घडामोडींच्या, युद्धाच्या, खेळाच्या बातम्याच प्रक्षेपण रेडिओद्वारे व्हायचे. गावात किंवा क्वचितच कोणाकडे आढळणार्‍या लाकडी बॉक्समधून आवाज ऐकायला गर्दी जमायची. रेडिओ सामान्य माणसाच्या ऐपतीत मिळू लागल्यानंतर घराघरात मनोरंजनाचं साधन बनला. गृहिणींचा, शेतकर्‍यांचा, भटक्यांचा मजनू, आवारांचा विरंगुळा आणि हक्काचा साथीदार म्हणजे रेडिओ.

विविध भारतीने रेडिओवरच्या मनोरंजनाला एक वेगळीच उंची बहाल केली. हवामहल, सितारों कि महफिल, एकाहून एक सरस गाणी, शास्त्रीय संगीत, आपकी पसंद, फौजी भाईयों के लिए हॅल्लो फरमाईश अशा सदाबहार कार्यक्रमांनी रेडिओ सामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनून गेला.

रेडिओवर प्रसारणासाठी म्हणून व्हाईस कल्चरसाठी हळू-हळू वर्कशॉप सुरू झाले. कित्येक कार्यक्रमांचे सिनेमांचे प्रमोशन देखील रेडिओच्या माध्यमातून केले जाऊ लागले. दृश्य नसतानाची फक्त आवाजाची जादू रसिकांच्या मनावर चालवणार्‍या एफएम रेडिओचा शोध लावणारे ईएच आर्मस्ट्राँग यांचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. त्यामुळे रेडिओच्या आठवणी जाग्या झाल्या. त्यांनी लावलेल्या रेडिओचा शोध एक इतिहास घडवून गेला.