देवगडमध्ये सापडले सर्वांत मोठे कातळशिल्प

देवगड, २९ डिसेंबर २०२२ : देवगडच्या कातळशिल्पांमध्ये वानिवडे गावात आतापर्यंतचे सर्वांत मोठे कातळशिल्प सापडले, अशी माहिती प्राच्याविद्या अभ्यासक रणजित हिर्लेकर यांनी दिली. श्री. हिर्लेकर यांनी सांगितले, की हे कातळशिल्प मांड या प्रकारातील असून, त्याच्या बाजूला पूर्ण मानवी आकृती कोरलेली आहे. या आकृतीच्या हाताला पहिल्यांदाच बोटे कोरण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे.

या आकृतीचे डोके वैशिष्ट्यपूर्ण असून, पाच केंद्रबिंदू दाखविण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे. यामुळे रत्नागिरीपासून देवगड, मालवणपर्यंत दिसणाऱ्या मानवी कातळचित्रात हे वैशिष्ट्यपूर्ण ठरावे, असे आहे. इतिहास मंडाळाचे सदस्य रणजित हिर्लेकर व अजित टाककर यांनी कातळशिल्पाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी व सर्वेक्षण केले आहे.

मांड या प्रकारची अनेक कातळशिल्पे देवगड तालुक्यातील शोधमोहिमेत सापडली; पण अतिशय व्यवस्थित व जास्त खोल कोरलेले हे कातळशिल्प असून, अनेक वैशिष्ट्यपूर्ण निरीक्षणे या कातळशिल्पाविषयी सांगता येतील. भविष्यात याचा अभ्यास केल्यानंतर स्पष्टीकरण दिले जाईल, असे सांगून कातळशिल्प संशोधन व पर्यटनाची ही वहिवाट देवगड तालुक्यात रुजणार आहे, असा आशावाद हिर्लेकर यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा