पैठण, छञपती संभाजीनगर, २४ एप्रिल २०२४ : मोटरसायकल आडवी लावून चक्क पोलिसालाच चाकूने मारहाण करून रोख रक्कम लुटल्याची घटना रविवार दि. 21 रोजी पैठण पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोपेवाडी फाट्यावर घडली होती. या घटनेमुळे पोलिसांचा खाकी वर्दीतला धाक दरारा संपला असुन गुंन्हेगाराची दहशत सुरु झाल्याचे चिञ दिसत आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास पैठण पोलिस ठाण्यातील हवालदार कृष्णा भुजंगराव दुबाले हे पैठण – शाहगड मार्गावरील तुळजापूर येथील आपल्या नातेवाईकाकडे गेले होते. यावेळी मोटरसायकलने तुळजापूरहुन पैठणकडे परत येत असताना गोपेवाडी फाट्यावर एका ढाब्या समोर एक अज्ञात मोटरसायकल चालकाने कृष्णा दुबाले यांना कट मारुन मोटर सायकल आडविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस कर्मचारी दुबाले यांनी त्याकडे कानाडोळा केला.
मात्र दुबाले हे काही अंतर पुढे गेल्यानंतर वडवाळी गावाच्या लगत पाण्याच्या टाकीजवळ तीन अनोळखी इसमांनी यांना अडवले आणि त्यांना शिविगाळ करून लाथाबुक्याने मारहाण केली. दरम्यान या तीन आरोपीपैकी एकाने चाकू काढून दुबाले याच्या कपाळावर मारले. त्यामुळे दुबाले हे जखमी झाले. तसेच आरोपींनी दुबाले यांच्या खिशातील ७ हजार ४०० रुपये बळजबरीने काढुन घेतले व पळून गेले.
या सर्व घटनेची पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. मात्र या घटनेमुळे जिथे पोलीसच सुरक्षित नाही तिथे सामान्य जनतेचे काय ? असा प्रश्नही निर्माण झाला आहे.
न्यूज अनकट प्रतिनीधी : मनोज परदेशी