लोकनाट्यातील महत्त्वाचे नाटक म्हणजे ‘विच्छा माझी पुरी करा’. या नाटकानेच दादा कोंडके यांना सुपरस्टार रंगकर्मी बनवले.
आजच्याच दिवशी २१ डिसेंबर १९६५ रोजी दादा कोंडके निर्मित व दिग्दर्शित आणि वसंत सबनीस लिखित ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाचा पहिला प्रयोग धोबी तलाव येथील रंगभवन येथे झाला. यानंतर या लोकनाट्याचे हजारो प्रयोग झाले.
या नाटकामुळे दादा कोंडकेंना अधिक ओळख मिळाली होती . या गुणी कलाकाराने आपल्या हजरजबाबी, तल्लख व धारदार शब्दांनी व अभिनयाने वगाची रंगत सतत वाढवीत ठेवली. काळाची बदलती पावले ओळखून लोकनाट्याचे स्वत्व न सोडता बदल करून त्याला आधुनिक रंग दिल्याने महाराष्ट्रात लोकनाट्याचे नवे पर्व सुरु झाले. तमाशा कलेला नवजीवन प्राप्त झाले.
दादा कोंडके यांनी या लोकनाट्याचा कुठेही प्रयोग लावला तरी तो हाऊसफुल होत असे. त्या काळात दादा कोंडके यांचे प्रतिस्पर्धी असणाऱ्या नाट्य निर्मात्यांच्या नाटकांचा तिकीटांचा दर काहीसा जास्त असे.
दादांच्या लोकनाट्याची ‘प्रॉडक्शन कॉस्ट’ खूप कमी असे. त्यामुळे या लोकनाट्यासाठी अगदी अल्पदर लावत असे. त्यामुळे त्यांचे प्रत्येक प्रयोग हाऊसफुल होत असत. गायिका आशा भोसले यांनी एकदा ‘विच्छा माझी पुरी करा’ चा प्रयोग पाहिला. फक्त एक माणूस प्रेक्षकांना पूर्ण साडेचार तास हसवतो. अशाप्रकारचे दृश्य प्रथमच पाहिले होते.
आशाताईंनी प्रख्यात दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांच्या कानावर घालून त्यांनाही हा प्रयोग पाहण्याचा आग्रह केला. त्यानुसार काही दिवसांनी आशाताई भालजींसह पुन्हा हे नाटक पाहायला आल्या.
भालजी ‘तांबडी माती’ चित्रपटाची निर्मिती करीत होते. दादांमधील कमालीचा कलाकार भालजींनी ओळखला. त्यातच त्यांनी या चित्रपटासाठी दादांची निवड केली. दादांनी याच चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांच्यानंतर अभिनेते विजय कदम यांनी काही वर्षे सातत्याने ‘विच्छा माझी पुरी करा’ चे प्रयोग केले.