डोंबिवली ५ फेब्रुवारी २०२५ : डोंबिवली निळजे रेल्वे उड्डाण पुलाच्या कामामुळे मंगळवार रात्रीपासून शिळफाटा रस्त्याचा पलावा चौक भाग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या निर्णयामुळे संपूर्ण मार्गावर भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू आहेत. केवळ ३० मिनिटांचा प्रवास पार करण्यासाठी तब्बल दोन ते अडीच तासांचा वेळ लागत आहे.
रस्ता बंद झाल्याने अनेक प्रवासी पर्यायी मार्गांचा वापर करत आहेत. मात्र, हे रस्ते अरुंद असल्याने तिथेही वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पलावा चौक मोठ्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला असला, तरी दुचाकी आणि कारसाठी एक मार्गिका खुली आहे. त्यामुळे अनेक वाहनचालकांनी पर्यायी मार्ग टाळून पलावा चौक मार्गे प्रवास करणे पसंत केले, परिणामी संपूर्ण परिसर वाहतूक कोंडीत अडकला आहे.
डोंबिवली, एमआयडीसी आणि २७ गावांतील प्रवाशांनी घारिवली, दिवा-आगासन, शिळमार्गे मुंब्राकडे जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, अरुंद रस्त्यांवर वाहनांची प्रचंड गर्दी झाल्याने हे मार्गही ठप्प झाले. आगासन रेल्वे फाटकाजवळ तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
स्थानीय नागरिकांचा संताप
वाहतूक कोंडीमुळे स्थानिक रहिवाशांना मुख्य रस्त्यावर वाहन आणणे अशक्य झाले आहे. शाळकरी विद्यार्थ्यांच्या बसेस कोंडीत अडकल्या असून, दुचाकीवरून आपल्या मुलांना शाळेत सोडणारे पालकही हलत नाहीत. परीक्षांचा महत्त्वाचा काळ असल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.
काही वाहनचालकांनी डोंबिवलीतून मोठागाव-माणकोली उड्डाण पूल मार्गे ठाण्याकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यामुळे डोंबिवलीतील दिनदयाळ रस्ता, मोठागाव आणि उमेशनगर भागातही कोंडी वाढली.
वाहतूक विभागाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बंदोबस्त तैनात केला आहे. मात्र, पहिल्याच दिवशी एवढी कोंडी झाल्याने पुढील पाच दिवस या मार्गावर प्रवास कसा करायचा, हा प्रश्न नोकरदार आणि व्यावसायिकांना भेडसावत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे