पुणे ९ फेब्रुवारी २०२५ : विकास आणि आधुनिकतेच्या गप्पा मारणाऱ्या पुणे शहराच्या पोटात झोपडपट्ट्यांचा ज्वालामुखी धगधगतोय! शिवाजीनगर, वाकडेवाडी, खडकी, दापोडी, सांगवी… शहराच्या कानाकोपऱ्यात झोपडपट्ट्यांचे जाळे पसरले आहे. वाढती लोकसंख्या आणि परराज्यातील लोंढे यामुळे अनधिकृत वस्त्या वाढतच चालल्या आहेत. पण प्रशासन मात्र डोळे झाकून बसले आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
पाणी नाही, वीज नाही, स्वच्छता तर दूरच!
या झोपडपट्ट्यांमध्ये मूलभूत सुविधांचा अक्षरशः दुष्काळ आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जीवघेणी स्पर्धा, दिवसातून काही तास वीज आणि दुर्गंधीयुक्त सार्वजनिक शौचालय… इथले जीवन म्हणजे नरकवास! महिला आणि लहान मुलांची अवस्था तर आणखी दयनीय आहे.


मेट्रो आला, सौंदर्य हरवले!
शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी मेट्रो प्रकल्प आला, पण झोपडपट्ट्यांच्या विळख्याने ते सौंदर्य झाकले गेले आहे. त्यात भर म्हणजे वाहतूक कोंडी. रोजच्या प्रवासात नागरिकांचे हाल होत आहेत.
पुनर्वसन एकच उपाय
या समस्येवर एकच उपाय आहे – झोपडपट्टीवासीयांचे योग्य पुनर्वसन! त्यांना सुरक्षित आणि हक्काचे घर देणे गरजेचे आहे. पण प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही.
सरकार कधी जागे होणार?
नागरिकांनी अनेकवेळा प्रशासनाकडे तक्रारी केल्या, पण उपयोग शून्य! त्यामुळे नागरिकांचा एकच सवाल आहे – “पुणे शहराला खरंच ‘स्मार्ट सिटी’ बनवायचं आहे की नाही?”
न्यूज अनकट प्रतिनिधी : सोनाली तांबे