पुणे, धनकवडी १७ फेब्रुवारी २०२५: पुणे-सातारा रस्त्यावरील पद्मावती चौक आणि आसपासच्या भागात फुटपाथ आणि मुख्य रस्त्यांवर फळ-भाजी विक्रेत्यांनी बेकायदा व्यवसाय ठाण मांडला आहे. यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा मिळत नाही, तर वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. सर्वात धक्कादायक म्हणजे, नागरिकांच्या तक्रारी असूनही महापालिका प्रशासन याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे.
वाहतुकीला अडथळा, अपघातांना आमंत्रण!
सायंकाळच्या वेळेस या भागातील रस्त्यांवर प्रचंड वर्दळ असते. त्यातच फुटपाथ व्यापून भाजीविक्रेते बसल्याने नागरिकांना चालण्यासाठी रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यातच खरेदीसाठी थांबणाऱ्या ग्राहकांच्या गाड्या रस्त्यावर पार्क केल्या जातात, त्यामुळे रस्त्यांची रूंदी आणखी कमी होते. या गोंधळामुळे अपघात होण्याचा धोका वाढत असूनही प्रशासन निष्क्रिय असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
महापालिकेचा वरदहस्त?
महापालिकेचे अतिक्रमण हटवण्याचे वाहन या भागात अनेकदा फिरते. मात्र, प्रशासन येण्यापूर्वीच विक्रेत्यांना कुणीतरी माहिती देत असल्याने ते सावध होतात आणि लगेच पसार होतात. त्यामुळे महापालिका आणि अनधिकृत विक्रेत्यांमध्ये मिलीभगत असल्याचा संशय नागरिक व्यक्त करत आहेत.
घोषणाबाजी आणि दिखावूपणाच्या कारवाया
महापालिकेकडून अधूनमधून अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमा राबवल्या जातात, मात्र त्या केवळ दिखावूपणापुरत्याच मर्यादित राहतात. काही वेळा फेरीवाल्यांना हटवले जाते, मात्र काही दिवसांतच ते पुन्हा त्याच ठिकाणी व्यवसाय सुरू करतात. त्यामुळे प्रशासनाची भूमिका केवळ घोषणाबाजीपुरतीच मर्यादित राहिली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुशांत ढमढेरे यांनी केला आहे.
कोण वाकडे करणार?
या फुटपाथवरील विक्रेत्यांना हटवण्यासाठी काही जागरूक नागरिकांनी प्रयत्न केला, मात्र त्यांना मग्रुरीची भाषा ऐकावी लागली. “आमचे कोण वाकडे करणार?” अशा उद्धट उत्तरांनी विक्रेते नागरिकांना थेट आव्हान देत आहेत. यामुळे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्यांची हिंमत वाढली आहे.
नागरिकांची मागणी – कठोर कारवाई करा!
धनकवडी, पद्मावती, सातारा रस्ता, कात्रज आदी भागांत अनधिकृत भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे वाहतूककोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असतानाही कोणतीही ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे या परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
“रस्त्याच्या कडेला बेकायदेशीर व्यवसाय करून सार्वजनिक ठिकाणे व्यापली जात आहेत. यामुळे नागरिकांचे हाल वाढले असून, वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे.” – आवेश मन्सुरी, सामाजिक कार्यकर्ते.
प्रशासन जागे होणार की हतबलच राहणार?
महापालिकेने जर कठोर कारवाई केली नाही, तर भविष्यात ही समस्या अधिकच गंभीर होईल. अनधिकृत विक्रेत्यांच्या मग्रुरीमुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. आता प्रशासन जागे होईल का, की हतबलतेने हात झटकत बसेल, हा प्रश्न पुणेकरांना सतावत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे