नवी दिल्ली : रांचीमध्ये तीन वर्षांपूर्वी १५ आणि १६ डिसेंबर २०१६ च्या मध्यरात्री एका इंजिनिअरिंगच्या एका विद्यार्थिनीवर बलात्कार करुन तिची जाळून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी असणाऱ्या राहुल रॉय याला शुक्रवारी (दि.२०) सीबीआयच्या विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुमावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रांची येथील इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीचा बलात्कार आणि हत्या करण्यात आली होती. यानंतर त्या आरोपीने पलायन केले होते. यानंतर सीबीआयने घटनास्थळावरील वस्तू आणि पीडितेच्या कपड्यांचे डीएनएची पडताळणी करून राहुल रॉयला अटक केली होती. यावर्षी २५ ऑक्टोबरमध्ये न्यायालयाने राहुल विरोधात आरोप निश्चित करण्यात आले होते.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत याची जलदगतीने दररोज सुनावणी घेण्यात आली. आरोपीचे वकील आणि सीबीआयच्या वकिलांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने २० डिसेंबर रोजी आरोपी राहुलला दोषी ठरवले असून त्याला शिक्षाही सुनावण्यात आली आहे.
या बलात्कार आणि हत्येप्रकरणी सीबीआयने १९ सप्टेंबर रोजी आरोपपत्र दाखल केले होते आणि २५ ऑक्टोबर रोजी या प्रकरणात आरोप निश्चित केले होते. या सुनावणीनंतर १३ डिसेंबर रोजी सीबीआयने आरोपीच्या फाशीची मागणी केली होती. दररोज सुनावणी घेत न्यायालयाने ३० दिवसांत प्रकरणाचा निकाल दिला आहे.