एकाच परिवारातील 7 जणांनी केली आत्महत्या!

7 people committed suicide
गाडीत सापडली सुसाईड नोट

गाडीत सापडली सुसाईड नोट

7 people committed suicide:हरियाणाच्या पंचकुलामधील सेक्टर 27 मध्ये 26 मे ला 10.30 च्या सुमारास एक चारचाकी गाडी पार्क केली जाते. अनोळखी गाडी पाहून रहिवासी चौकशी करायला येतात, तर गाडीत सगळेच झोपलेले दिसतात. केवळ एक व्यक्ती जरा शुद्धीत असतो. विचारपूस केली जाते; तर उत्तर येत, “आम्ही इथे झोपणार आहोत.” रहिवासी अशी परवानगी नाही म्हणतच असतात, तेच गाडीतून घाणेरडा वासही येतोय याची जाणीव होते. काहीतरी संशयास्पद असल्याची जाणीव रहिवाशांना होते म्हणून त्या व्यक्तीला गाडीतून खाली उतरवलं जातं, तर तो इसम म्हणतो, “कर्ज खूप झाल्यामुळे आम्ही सगळ्यांनी विष घेतल आहे, मी ही मरेल थोड्यावेळात.नातेवाईक खूप श्रीमंत आहेत, पण कोणीच मदत नाही केली..” आणि एवढं बोलून तो बेशुद्ध पडतो… पोलिसांना बोलावलं जातं .. ॲम्ब्युलन्सला ही बोलावलं जातं मात्र ती येते 40-45 मिनिटांनी .. तोवर हे संपूर्ण कुटुंब काळाच्या पडद्या आड गेलेलं असतं.. आणि मग सुरू होतो पोलिस तपास ..

जुलै 2018, दिल्ली, बुराडी सामूहिक आत्महत्या प्रकरणाची आठवण करून देणारी ही हरियाणातील थरारक कहाणी नेमकी काय आहे? पाहूयात..

हरियाणाच्या पंचकुला येथे 27 मे 2025 रोजी घडलेली एकाच कुटुंबातील सात जणांच्या सामूहिक आत्महत्येची घटना संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. ही घटना केवळ एक दु:खद प्रसंगच नाही, तर समाजातील आर्थिक तंगी, मानसिक तणाव आणि सामाजिक दबाव यांचे गंभीर परिणाम दर्शवणारी आहे.

पंचकुला येथील सेक्टर 27 मधील एका परिसरात, सोमवार, 26 मे 2025 रोजी रात्री उशिरा एका पार्क केलेल्या कारमध्ये सात मृतदेह आढळलेत. हे सर्व मृतदेह उत्तराखंडच्या डेहराडून येथील एकाच कुटुंबातील होते. मृतांमध्ये प्रवीण मित्तल (वय 42), त्यांची पत्नी रीना मित्तल, त्यांचे माता-पिता (देशराज मित्तल आणि त्यांची पत्नी), तसेच त्यांची दोन मुली आणि एक मुलगा यांचा समावेश आहे. हे कुटुंब पंचकुला येथे बागेश्वर धाम येथील पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या पाच दिवसीय हनुमंत कथा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. कथा संपल्यानंतर डेहराडूनला परतताना त्यांनी सेक्टर 27 मधील एका बिल्डिंगसमोर कार थांबवून विष घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

गाडीत सापडली सुसाईड नोट
पोलिसांना घटनास्थळी दोन पानांची सुसाईड नोट सापडली, ज्यामध्ये प्रवीण मित्तल यांनी लिहिले आहे की, “मी बँकेकडून दिवाळखोर झालो आहे. माझ्यामुळे हे सर्व घडले आहे.” या नोटमध्ये कुटुंबावर 15-20 करोड रुपयांचे कर्ज असल्याचा उल्लेख आहे. प्रवीण मित्तल यांनी पूर्वी हिमाचल प्रदेशातील बद्दी येथे स्क्रॅपची फॅक्ट्री चालवली होती, जी कर्जामुळे बँकेने जप्त केली. त्यानंतर त्यांनी डेहराडून येथे टूर अँड ट्रॅव्हलचा व्यवसाय सुरू केला, परंतु तोही अयशस्वी ठरला. यामुळे कुटुंब आर्थिक तंगीत सापडले. याशिवाय, कुटुंबाला कर्जाच्या वसुलीसाठी धमक्या मिळत होत्या, ज्यामुळे त्यांचा मानसिक ताण वाढला.

प्रत्यक्षदर्शी आणि पोलिस कारवाई
प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, रात्री उशिरा त्यांना एका कारमधून संशयास्पद हालचाली दिसल्या. कारजवळ गेल्यावर प्रवीण मित्तल यांनी त्यांना सांगितले की, त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने कर्जामुळे विष प्राशन केले आहे. त्यानंतर प्रवीण बेशुद्ध पडले. पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले, परंतु ॲम्ब्युलन्स 40-45 मिनिटांनी उशिरा आल्याने कोणालाही वाचवता आले नाही. पंचकुला पोलिसांनी डीसीपी हिमाद्री कौशिक आणि डीसीपी अमित दहिया यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू केला आहे. फॉरेन्सिक तपासणीसाठी मृतदेह शवविच्छेदनाला पाठवण्यात आले असून, कारमधून मिळालेले पुरावे (जसे की औषधाची गोळी, मुलांच्या वह्या, चाव्यांचे पाकीट) गोळा करण्यात आले आहेत.

कुटुंबाची पार्श्वभूमी
प्रवीण मित्तल मूळचे हरियाणातील हिसार जिल्ह्यातील बरवाला येथील होते. गेल्या 12 वर्षांपासून ते पंचकुला येथे राहत होते, परंतु आर्थिक संकटामुळे पाच वर्षांपूर्वी देहरादूनला स्थलांतरित झाले. ते पूर्वी ‘चाइल्ड लाइफ केअर मिशन’ नावाची एनजीओ चालवत होते. त्यांनी गंभीर सिंह नेगी यांच्या नावावर फायनान्स केलेली कार वापरली होती, जी या घटनेत वापरण्यात आली.

पंचकुला येथील ही घटना दिल्लीतील 2018 च्या बुराडी आत्महत्या प्रकरणाची आठवण करून देते. याशिवाय, सुरत सामूहिक आत्महत्या (ऑक्टोबर 2023, गुजरात)अशा काही अन्य घटनाही देशभरात घडल्या आहेत, ज्या आर्थिक तंगी, मानसिक तणाव आणि सामाजिक दबाव यांच्याशी संबंधित आहेत. मात्र खरंच आत्ताची ही घटना जशी दिसते तशीच आहे का? आर्थिक तंगी या सात जीवांवर भारी पडली का? बागेश्वर धाम येथील पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या पाच दिवसीय हनुमंत कथा कार्यक्रमानंतर आत्महत्या करायच अस ठरवलं होत का? अस असेल तर यामागे काही धार्मिक कारण तर नाही ना? ही नक्की आत्महत्याच होती ना? असे अनेक प्रश्न अद्याप गुलदस्त्यातच आहेत..

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रज्ञा शिंदे