भोसरी एमआयडीसी; पावसात वाहून गेलेली उद्योजकांची स्वप्नं आणि कोट्यवधींचं नुकसान!

Bhosari MIDC Flood Damage and Industrial Losses
भोसरी एमआयडीसी;

Bhosari MIDC Flood Damage and Industrial Losses: भोसरी एमआयडीसीतील ‘टी ब्लॉक’ परिसरातील उद्योजकांवर सध्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आकाशातून कोसळलेल्या मुसळधार पावसाने केवळ पाणीच नाही, तर अनेक छोट्या-मोठ्या कंपन्यांमधील कोट्यवधी रुपयांचे उत्पादन, यंत्रसामग्री आणि वर्षानुवर्षांची मेहनत अक्षरशः वाहून नेली आहे. हे चित्र दरवर्षीचे असूनही, महापालिका आणि एमआयडीसी यांच्याकडून ठोस उपाययोजनांबाबत डोळेझाक केली जात असल्याचा आरोप संतप्त उद्योजक करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भोसरी एमआयडीसीच्या टी ब्लॉकमध्ये रस्त्यावरील पाणी थेट कंपन्यांमध्ये शिरले. याचा परिणाम म्हणून उत्पादित माल खराब झाला, यंत्रसामग्री पाण्यात बुडाली आणि अनेक ठिकाणी तीन ते चार फूट पाणी साचल्याने उत्पादन प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली. शॉर्टसर्किटचा धोका निर्माण झाल्याने कामकाज थांबवावे लागले, ज्यामुळे उद्योजकांचे कोट्यवधींचे आर्थिक नुकसान झाले. महावीर रबर इंडस्ट्रीजमध्ये तर पाण्याचा लोंढा इतका मोठा होता की कंपनीची भिंत कोसळली आणि कचरा व माती वाहून आली, ज्यामुळे चार दिवस कामकाज बंद ठेवावे लागले आणि १२ ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाले, असे नयन भंडारी यांनी सांगितले.

या संदर्भात उद्योजक अनेक वर्षांपासून उपाययोजनांची मागणी करत आहेत. मात्र, महापालिका आणि एमआयडीसी एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. एमआयडीसीचे मुख्य अभियंता नितीन वानखेडे यांनी हा परिसर महापालिकेकडे हस्तांतरित केल्याचे सांगितले, ज्यामुळे उद्योजकांची समस्या आणखीनच वाढली आहे. “आम्ही लाखो रुपयांचा कर वेळेवर भरतो, तरीही पावसाळी पाण्याचा निचरा, कचरा व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत सुविधाही मिळत नाहीत,” अशी खंत उद्योजक व्यक्त करत आहेत

ग्रँटॅक इंडस्ट्रीजचे मालक कृष्णा बाळके यांच्या मते, त्यांच्या कंपनीसह शेजारील चार कंपन्यांसमोर रस्त्यावर पाणी साठते. अर्धा तास पाऊस पडल्यास तळे तयार होऊन पाणी कंपन्यांमध्ये शिरते. रस्त्याचे काम झाल्यानंतर रस्ता उंच झाला आणि भूमिगत सांडपाणी वाहिनी अर्धवट ठेवल्याने ही समस्या कायमची झाली आहे. प्रशासनाच्या अनास्थेमुळे संतप्त झालेल्या काही कंपन्यांनी स्वतःच विद्युत मोटारी लावून पाणी बाहेर काढले.

फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अभय भोर यांनी, अधिकारी केवळ बैठकांचे सोपस्कार पूर्ण करतात, प्रत्यक्ष पाहणी करत नाहीत असा आरोप केला आहे. पिंपरी चिंचवड प्लास्टिक असोसिएशनचे अध्यक्ष नितीन गट्टानी यांनी, या नियोजनाअभावी लहान उद्योजकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, ते हे नुकसान कसे भरून काढणार या चिंतेत असल्याचे म्हटले आहे. यावर ह प्रभागाच्या क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे यांनी, पावसाळापूर्व नालेसफाईची कामे केली होती आणि सध्याची समस्या तातडीने दूर केली जाईल असे आश्वासन दिले आहे. मात्र, उद्योजकांना आता केवळ आश्वासने नको, तर ठोस कृती हवी आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे