आता ‘पीएमपी’चा पास तुमच्या दारात! प्रवाशांसाठी ‘फिरते पास केंद्र’ सुरू

PMPML Launches ‘Mobile Pass Centers’ to Bring Bus Pass Services Closer to Commuters

पुण्यात रोज लाखो प्रवासी पीएमपीएमएलच्या बसेसचा वापर करत असताना, ‘पास’साठी लांबलचक रांगा ही कायमची डोकेदुखी होती. पण आता हे चित्र बदलणार आहे! पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) एक आधुनिक आणि नागरिक-केंद्री उपक्रम राबवला आहे — ‘फिरते पास केंद्र’!

या उपक्रमामुळे आता प्रवाशांना किंवा विद्यार्थ्यांना पाससाठी बस डेपोमध्ये तासनतास उभं राहावं लागणार नाही. कारण, पास केंद्रच तुमच्या परिसरात फिरणारं आहे! या उपक्रमाची सुरुवात पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात झाली.

या फिरत्या केंद्रामध्ये विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी मासिक पास काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसंच, पुणे महापालिकेच्या अनुदानित पास योजना, महिला विशेष सेवा, रात्रसेवा, पुणे दर्शन टूरिस्ट बस, आणि ‘आपली पीएमपीएमएल’ मोबाईल अ‍ॅपबाबतची माहितीही येथे मिळणार आहे.

सध्या ही सेवा पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए हद्दीतील ६ ठिकाणी, सोमवार ते शनिवार, सकाळी ७.३० ते दुपारी १.३० दरम्यान उपलब्ध आहे. पासचे शुल्क रोख रक्कम, QR कोड आणि POS मशीनद्वारे स्वीकारले जाणार आहे — म्हणजे एकदम कॅशलेस आणि स्मार्ट सेवा!

फिरत्या पास केंद्राचं साप्ताहिक वेळापत्रक:

सोमवार: एसएनडीटी कॉलेज (मेट्रो स्थानक)

मंगळवार: कोंढवा गेट (एनडीए गेट सर्कल)

बुधवार: खडी मशिन चौक (के.जे. व जे.के. कॉलेज)

गुरुवार: राधा चौक (बाणेर-बालेवाडी)

शुक्रवार: हिंजवडी गाव (शिवाजी चौक)

शनिवार: आकुर्डी रेल्वे स्टेशन

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे