गणेशोत्सवाच्या काळात पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर मोठी कारवाई करत ११ दिवसांत तब्बल १०७० प्रवाशांना दंड ठोठावला आहे. या कारवाईतून पीएमपीने तब्बल ५ लाख ३५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत बससेवा सुरू असल्याने प्रवाशांची संख्या वाढली होती. मात्र, याचाच फायदा घेत अनेकांनी विनातिकीट प्रवास करण्याचा प्रयत्न केला. पण पीएमपी प्रशासनाने शहरातील १२ ठिकाणी तपासणी नाके उभारून प्रवाशांना गाठले आणि कठोर कारवाई केली. विशेष म्हणजे, पुणे शहरात पिंपरी-चिंचवडच्या तुलनेत अधिक प्रवासी विनातिकीट आढळले आहेत.
पीएमपीने तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली असून, प्रत्येक मार्गावर बसची तपासणी वारंवार केली जात आहे. त्यामुळे “१० रुपयांच्या तिकीटासाठी ५०० रुपयांचा दंड भरण्यापेक्षा तिकीट काढून प्रवास करणेच योग्य” असा संदेश या कारवाईतून मिळत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे













































