प्रभागरचनेतील गोंधळ – सुनावणीवेळी नागरिकांचा प्रशासनावर संताप

पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप प्रभागरचनेवर नागरिकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. कमला नेहरू हॉस्पिटल-रास्ता पेठ येथील सुनावणीदरम्यान सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नैसर्गिक सीमारेषा आणि भौगोलिक सलगतेकडे दुर्लक्ष करून अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गाच्या लोकसंख्येची सोयीस्कर विभागणी केल्याचा आरोप करण्यात आला.

नागरिकांच्या मते, यामुळे सामाजिक न्याय आणि आरक्षणाच्या मूळ उद्देशालाच धक्का पोहोचला आहे. पुणे महापालिकेत एकूण ४१ प्रभागांमध्ये १६७ नगरसेवक असणार आहेत. प्रारूप रचनेवर आलेल्या ५,९२२ हरकतींपैकी २,९२० हरकतींची बालगंधर्व रंगमंदिर येथे सुनावणी झाली. यापैकी केवळ ५४० हरकतधारक प्रत्यक्ष हजर होते. नैसर्गिक सीमा आणि अनुकूल भाग जोडण्यासंबंधित हरकती सर्वाधिक असल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे अशी मागणी केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे