कर्ज आणि अतिवृष्टीच्या ताणाखाली शेतकऱ्याची आत्महत्या,धाराशिवात शोक

अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांतच दोन दुर्दैवी घटना घडल्या आहेत. काल अणदूर येथील उमेश सूर्यकांत ढेपे (वय ४५) या शेतकऱ्याने कर्ज व अतिवृष्टीचा ताण सहन न करता आत्महत्या केली होती. त्यानंतर आज धाराशिव तालुक्यातील वाखरवाडी येथील पोपट केशव पवार (वय ५५) यांनी देखील नापिकी, कर्ज आणि अतिवृष्टीमुळे गळफास घेऊन आपले जीवन संपवले.

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अतिवृष्टीचा प्रचंड फटका बसला आहे. पिकांचे नुकसान, वाढते कर्ज आणि आर्थिक संकटामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहेत. पोपट पवार यांनी गुरुवारी सकाळी स्वतःच्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, कळंब धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी पोपट पवार यांच्या कुटुंबीयांना सांत्वनपर भेट दिली. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर प्रशासन आणि समाजाची त्वरित दखल घेण्याची गरज आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी रहीम शेख