अमित शहांचे संकेत स्पष्ट — बिहारमध्ये निकालानंतरच ठरेल मुख्यमंत्रीपद

बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु झाली आहे. या वेळी निवडणूक दोन टप्प्यांत पार पडणार असून, ६ आणि ११ नोव्हेंबरला मतदान, तर ११ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. बिहारमध्ये सत्ताधारी एनडीए आणि विरोधी महागठबंधन यांच्यात थेट लढत रंगणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, सर्व राजकीय पक्षांनी आपल्या रणनितीची आखणी केली आहे.

राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती म्हणजे, “एनडीए पुन्हा सत्तेत आल्यास मुख्यमंत्री कोण होणार?” या प्रश्नावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या विषयावर महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली. “एखाद्याला मुख्यमंत्री करणारा मी कोण?” असा प्रतिप्रश्न करत त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. शहा पुढे म्हणाले की, “एनडीएमध्ये अनेक पक्ष आहेत. निवडणुकीनंतर सर्व विधिमंडळ गटनेते मिळून आपला नेता ठरवतील.”

त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. विशेष म्हणजे, २०२० च्या बिहार निवडणुकीत भाजप आणि जेडीयूची युती झाली होती. त्या वेळी भाजपला ७४ तर जेडीयूला ४३ जागा मिळाल्या होत्या. अधिक जागा जिंकूनही भाजपने नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्रीपद दिले, कारण त्यांची घोषणा आधीच झाली होती. मात्र, यावेळी भाजपने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.

अमित शहा यांनी स्पष्ट केले की, “विधानसभा निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वात लढत आहोत, मात्र मुख्यमंत्रिपदाचा निर्णय निकालानंतर घेऊ.” त्यांच्या या विधानामुळे आता “महाराष्ट्र पॅटर्न” बिहारमध्ये राबवला जाऊ शकतो का? असा प्रश्न राजकीय विश्लेषक उपस्थित करत आहेत. महाराष्ट्रातही अशीच परिस्थिती होती — निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात महायुती लढली होती, पण निकालानंतर भाजपने मुख्यमंत्रिपद आपल्याकडे घेतले.

याच पार्श्वभूमीवर, बिहार निवडणुकीतही निकालानंतर भाजप नितीश कुमार यांच्या जागी आपला मुख्यमंत्री बसवेल का, यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या तरी भाजपकडून स्पष्ट भूमिका घेतली गेलेली नसली, तरी अमित शहांच्या संकेतांमुळे “सत्तेच्या समीकरणात मोठे बदल घडू शकतात” अशी शक्यता वर्तवली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील