दूषित पाण्याचे संकट

दरवर्षी शहरी आणि ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. पाण्याचे नमुने दूषित होण्याचे वाढते प्रमाण आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम हे मुद्दे उन्हाळ्यात चर्चेला येत असतात. जागतिक महाशक्ती होण्याचा दावा एकीकडे केला जात असताना दुसरीकडे मात्र नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी देऊ शकत नाही, हे मोठे अपयश आहे. उन्हाळ्याचा तीव्रतेने वाढता उकाडा, कोरडी पडणारी जलस्रोतांची पातळी आणि पाण्यासाठी वाढणारी धावपळ या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून देशभर दूषित पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक तीव्र होताना दिसतो. पिण्याचे स्वच्छ पाणी ही माणसाची मूलभूत गरज असली, तरी प्रत्यक्षात मात्र या गरजेची पूर्तता अनेक ठिकाणी अत्यंत असुरक्षित पद्धतीने होत आहे. विशेषतः उन्हाळ्यात पाण्याचा तुटवडा निर्माण झाला, की उपलब्ध असलेल्या कोणत्याही स्रोताचा वापर करण्याची वेळ नागरिकांवर येते आणि याच ठिकाणी दूषित पाण्याचा धोका अनेकपटींनी वाढतो. दरवर्षी देशात दूषित पाण्यामुळे हजारो लोकांना जीव गमवावा लागतो, तर लाखो नागरिक विविध जलजन्य आजारांनी त्रस्त होतात. अतिसार, कॉलरा, टायफॉईड, हेपॅटायटीस-ए यांसारख्या आजारांचे प्रमाण उन्हाळ्यात आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला वाढते. आरोग्य व्यवस्थेवर याचा प्रचंड ताण पडतो; परंतु या पुनरावृत्ती होणाऱ्या संकटाकडे दीर्घकालीन उपाययोजनांच्या दृष्टीने पाहिले जात नाही. परिणामी, प्रत्येक वर्षी तीच परिस्थिती नव्याने उभी राहते आणि जीवितहानीचे चक्र थांबत नाही. या समस्येची मुळे केवळ नैसर्गिक कारणांमध्ये नाहीत, तर मोठ्या प्रमाणात मानवनिर्मित त्रुटींमध्ये आहेत. शहरांमधील जीर्ण झालेल्या पाणीपुरवठा पाइपलाइन, गळतीमुळे त्यात मिसळणारे सांडपाणी, अनियोजित नागरीकरण, आणि विकासकामांदरम्यान घेतली न जाणारी काळजी या सर्व बाबी पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता खालावण्यास कारणीभूत ठरतात. अनेक वेळा रस्ते किंवा इतर पायाभूत कामे करताना पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइनचे नुकसान होते आणि त्यातून सांडपाण्याचा थेट प्रवेश पिण्याच्या पाण्यात होतो. या प्रक्रियेत केवळ निष्काळजीपणा नाही, तर समन्वयाचा पूर्ण अभावही दिसून येतो. ग्रामीण भागात परिस्थिती आणखी गंभीर आहे.

विहिरी, हातपंप किंवा तलाव यांसारख्या स्रोतांवर अवलंबून असलेल्या लोकांना पाण्याच्या गुणवत्तेबाबत फारसा पर्याय उपलब्ध नसतो. उन्हाळ्यात पाण्याची पातळी घटल्यामुळे या स्रोतांतील पाणी अधिक दूषित होण्याची शक्यता वाढते. त्यातच स्वच्छता व्यवस्थेचा अभाव आणि उघड्यावर शौचास जाण्याची प्रथा अजूनही काही भागांत अस्तित्वात असल्याने जलस्रोतांवर थेट परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर सर्वात गंभीर बाब म्हणजे सरकारी यंत्रणांची बेपर्वाई आणि कुप्रबंधन. दूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक आजारी पडल्याच्या घटना समोर आल्यानंतर तत्काळ हालचाली सुरू होतात, तपासाच्या घोषणा होतात, जबाबदारांवर कारवाईचे आश्वासन दिले जाते आणि पीडितांना मदतीची घोषणा केली जाते; मात्र काही दिवसांनी हीच यंत्रणा पुन्हा पूर्ववत निष्क्रिय होते. समस्येच्या मुळाशी जाऊन तिचे कायमस्वरूपी निराकरण करण्याऐवजी केवळ तात्पुरत्या उपाययोजना केल्या जातात. पाणीपुरवठा व्यवस्थेची नियमित तपासणी, पाइपलाइनची दुरुस्ती आणि आधुनिकीकरण, विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वय आणि जलगुणवत्तेची सातत्याने चाचणी या मूलभूत बाबी काटेकोरपणे राबवणे अत्यावश्यक आहे. याशिवाय, जबाबदारी निश्चित करणारी आणि त्रुटींसाठी कठोर कारवाई करणारी यंत्रणा उभी राहणेही तितकेच गरजेचे आहे. अन्यथा, प्रत्येक वेळी काही कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाई करून किंवा चौकशी समित्या नेमून प्रश्न मिटवण्याचा दिखावा सुरूच राहील. नागरिकांच्या दृष्टीनेही जागरूकता महत्त्वाची आहे. पाणी उकळून पिणे, फिल्टरचा वापर आणि पाण्याच्या स्त्रोतांबाबत सतर्कता या गोष्टी वैयक्तिक पातळीवर उपयुक्त ठरू शकतात; मात्र या उपाययोजना समस्येचे मूळ निराकरण नाहीत. स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे आणि ती कोणत्याही परिस्थितीत टाळता येणार नाही. दूषित पाण्याचा प्रश्न हा केवळ आरोग्याचा मुद्दा नाही, तर तो प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा आणि प्राधान्यक्रमांचा कस लावणारा मुद्दा आहे. जर आजही या समस्येकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही, तर भविष्यात ती अधिक भीषण रूप धारण करू शकते. स्वच्छ पाणी ही केवळ घोषणा न राहता प्रत्यक्षात प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचली, तरच या समस्येवर खऱ्या अर्थाने मात करता येईल.

पिण्याचे स्वच्छ पाणी ही माणसाच्या जगण्यातील सर्वांत मूलभूत गरज मानली जाते. अन्न, वस्त्र, निवारा यांच्याइतकीच किंबहुना त्याहूनही अधिक महत्त्वाची ही गरज आहे. कारण पाण्याशिवाय जीवन अशक्य आहे. त्यामुळेच पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा किंवा दुर्लक्ष स्वीकारार्ह ठरू शकत नाही. तथापि, वास्तव चित्र मात्र याच्या नेमक्या उलट दिसते. देशातील अनेक भागांत दूषित पिण्याच्या पाण्यामुळे लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याच्या घटना अधूनमधून समोर येत राहतात. प्रत्येक वेळी अशा घटना घडल्यावर सरकारी यंत्रणांकडून सर्व काही सुरळीत करण्याची हमी दिली जाते; मात्र काही काळ उलटताच तशाच स्वरूपाची घटना पुन्हा कुठेतरी घडलेली दिसते. यावरून प्रश्न केवळ व्यवस्थेच्या अपयशाचा नाही, तर त्यामागील दृष्टिकोनाचाही आहे, हे स्पष्ट होते. अलीकडेच जयपूरमधील सुशीलपुरा परिसरात घडलेली घटना ही या समस्येचे ठळक उदाहरण ठरते. दूषित पिण्याच्या पाण्यामुळे शेकडो नागरिक आजारी पडले. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांना त्याचा सर्वाधिक फटका बसला. उलट्या, जुलाब, पोटदुखी, मळमळ आणि ताप अशी लक्षणे मोठ्या प्रमाणावर दिसून आली. रस्ते बांधकामाच्या कामादरम्यान पाण्याची भूमिगत पाइपलाइन तुटली आणि त्यात सांडपाण्याची मिसळ झाली. ही घटना केवळ एका शहरापुरती मर्यादित नाही, तर ती देशभरातील पायाभूत सुविधांच्या नियोजनातील त्रुटींचे आणि समन्वयाच्या अभावाचे द्योतक आहे. मुळात प्रश्न असा निर्माण होतो, की ज्या काळात ‘प्रत्येक घरात स्वच्छ पाणी’ पुरवण्याचे दावे जोरात केले जात आहेत, त्याच वेळी नागरिकांच्या घरांपर्यंत दूषित पाणी कसे पोहोचते? या प्रश्नाचे उत्तर शोधताना अनेक स्तरांवरील त्रुटी उघड होतात. पाणीपुरवठा यंत्रणांची जुनी व जीर्ण अवस्था, नियमित देखभालीचा अभाव, विविध विभागांमधील समन्वयाचा अभाव आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जबाबदारीची स्पष्ट जाणीव नसणे ही त्यातील काही प्रमुख कारणे आहेत. रस्ते, गटार किंवा इतर पायाभूत कामे करताना पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइनचे संरक्षण करण्याची आवश्यक काळजी घेतली जात नाही. परिणामी, एखादी छोटी चूक मोठ्या आरोग्यसंकटात परिवर्तित होते. ही पहिलीच वेळ नाही, की अशा प्रकारची घटना घडली आहे. काही महिन्यांपूर्वी देशातील सर्वाधिक स्वच्छ शहरांपैकी एक मानल्या जाणाऱ्या इंदूरमध्येही दूषित पाण्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आणि शेकडो लोक आजारी पडले होते. त्या वेळी हा विषय राष्ट्रीय पातळीवर चर्चिला गेला. चिंता व्यक्त झाली आणि उपाययोजनांचे आश्वासन देण्यात आले; मात्र त्या घटनेतून आवश्यक धडे घेतले गेले का, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. कारण परिस्थिती बदललेली दिसत नाही. सरकारी यंत्रणांच्या कामकाजात दिसून येणारी ही बेपर्वाई केवळ प्रशासनिक त्रुटी नाही, तर ती नागरिकांच्या आरोग्याशी आणि जीविताशी थेट संबंधित आहे. कोणतीही दुर्घटना घडल्यावर काही कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाई करून किंवा पीडितांना भरपाई जाहीर करून प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न केला जातो; परंतु या समस्येच्या मुळाशी असलेली व्यवस्थात्मक कमतरता तसेच राहते. परिणामी दोषींवर खऱ्या अर्थाने कारवाई होत नाही आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक असलेले ठोस बदलही घडत नाहीत. यावर उपाय म्हणून केवळ तात्पुरत्या घोषणा किंवा आश्वासने पुरेशी ठरणार नाहीत. पाणीपुरवठा यंत्रणांची नियमित तपासणी, पायाभूत कामांदरम्यान काटेकोर समन्वय, तांत्रिक पातळीवरील सुधारणांचा अवलंब आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जबाबदारी निश्चित करणारी ठोस यंत्रणा उभारणे या सर्व बाबींवर गंभीरपणे काम करणे आवश्यक आहे. याशिवाय, नागरिकांनाही पाण्याच्या गुणवत्तेबाबत जागरूक करणे आणि तक्रार निवारणासाठी प्रभावी यंत्रणा उपलब्ध करून देणे तितकेच गरजेचे आहे.

भागा वरखडे