मोशी दुर्घटना: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी; दोषींवर कठोर कारवाईसह बाधितांना सर्वतोपरी मदतीची ग्वाही!

पुणे : मोशी येथील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज थेट दुर्घटनास्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या शोध व बचावकार्याची प्रत्यक्ष पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेतला. तसेच, दुर्घटनेत बाधित झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व प्रशासनामार्फत सर्वतोपरी मदत देण्याची ग्वाही दिली.

या पाहणी दौऱ्यावेळी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार सुनील शेळके, माजी आमदार विलास लांडे, महापौर रवी लांडगे, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, नगरसेवक विठ्ठल (नाना) काटे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम व तृप्ती सांडभोर, उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी – दिनेश वढणे