सावित्रीची लेक

म्या घरात चूलीपाशी बसले व्हते, आय फूंकनीनं इस्तू पेटवत व्हती, घरभर नीसता धूर झालता. माझ्या तर बाय डोळ्यात निसत्या पान्याच्या धारा लागल्या व्हत्या.

“चल गं कालवनाचं भांड ठेव चूलीवर ” आय वरडली, काल धरनं आयचं डोकं नाय थाऱ्यावर.

बा नं काल फूले बाबाच्या शाळंत नेलतं ना.

“पोरीला कशापाई नेताय, त्या नवरा बायकूला येक कळत नाय, पोरींना मड्डम कराया निघाल्यात, पर तूमी कशापाई पोरीचा जीव घेताय ” आय दिसभर वरडत व्हती, पर बा नं काय ऐकलं नाय, सरळ माजा हात धरला अन नेलं शाळकडं. रसत्यानं जात व्हतो तर येका वाड्यापाशी हातात काठ्या कोयते घेऊन दांडगी मानसं ऊबी व्हती. फूलेबाबाच्या शाळंत जानाऱ्यांचे पाय गळ्यात देनार म्हनत व्हती.

“तूज्या जीवाची काळजी हाय पोरी, नायतर मी बी दोन हात केले असते ” बा म्हनला अन मला घेऊन माघारा घरी आला.

आज सकाळ धरनं ह्योच इचार करतीये की आपल्याला फूलेबाबाच्या साळत जायला मिळल की नाय, अन बा बी कूटं दिसना.

आयेनी ह्ये भांड्याचा ढीग टाकला समोर.

“घासून घे भांडी, घरकाम कर जरा, बूकं शिकतीये ” आयेनी हे बोलून मोरीपाशी बसवलं. डोळ्यात टचकन पानीच आलं माझ्या.

“पोरी हिकडं ये जरा ” बा ची अंगनातून हाक आली, अन मी घाईनं अंगनात गेले. बा मोठं पोतं उघडून उबा व्हता.

“बस यात “बा म्हनला, बाई माजे पोत्यात बसाया सांगत व्हता.

“अगं बस, करतो मूटकूळं, अन नेतो फूलेबाबाच्या शाळंत, बघू कोन अडवतय ” बा चं बोलणं ऐकलं अन झापकन पोत्यात जाऊन बसले. बा नं उचललं पोतं अन घेतलं पाठीवर.

कूनी इचारतय “काय नेतोयस रं? ”

बा सांगतोय “जवार “,तर कधी ” बाजरी ” तर कोनाला “तांदूळ ”

मी हातानं पाय घट धरून निपचीप बसून व्हते.

अन अखेर बूड टेकलं, पोतं बा नं उघडलं

“शाळा शिकवा लेकीला ” बा म्हनला, म्या अजून डोळे मिटूनच बसले व्हते. डोईवरून आयेचा हात फीरला.

“पोरी शाळा शिकणार? ” मी फटकन डोळे उघडले तर कपाळावर आडवं कूकू असलेली बाय माज्याशी बोलत व्हती.

त्या आडव्या कूकवाच्या चीरीनं नंतर खूप काय काय शिकवलं अन येक नवं नाव दीलं.

सावित्रीची लेक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा