गोल पोस्ट राष्ट्रीय सोळा हजार रुग्णांना जीवदान देणाऱ्या डॉक्टरांचा हार्ट अटॅकने मृत्यू

सोळा हजार रुग्णांना जीवदान देणाऱ्या डॉक्टरांचा हार्ट अटॅकने मृत्यू

जामनगर, ७ जून २०२३ : गुजरातमधील जामनगर येथील प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ. गौरव गांधी यांचे झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी गांधी यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गांधी हे हार्ट स्पेशालिस्ट होते. असे असताना त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. गांधी यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याने डॉक्टरही संभ्रमित झाले आहेत.

डॉ. गौरव गांधी यांनी नेहमीप्रमाणे सोमवारीही दिवसभर रुग्णांना तपासले. काही सर्जरीही केली. रात्रीही रुग्णांना तपासून ते घरी गेले. ते त्यांच्या पॅलेस रोडवरील राहत्या घरी आले आणि जेवण करून थोड्यावेळाने ते झोपायला गेले. त्यांच्या चालण्याबोलण्यात काहीच बदल नव्हता. नेहमीप्रमाणे ते हसतमुख होते. त्यांची प्रकृतीही ठणठणीत होती. नेहमीप्रमाणे मंगळवारी पहाटे ६ वाजता त्यांचे कुटुंबीय त्यांना उठवायला गेले. त्यावेळी ते झोपेतून उठलेच नाहीत.

बराचवेळ प्रयत्न करूनही ते झोपेतून न उठल्याने घरचे लोक घाबरले. त्यांनी तात्काळ गांधी यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हार्ट अटॅकमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गौरव गांधी यांनी त्यांच्या वैद्यकीय कारकिर्दीत १६ हजाराहून अधिक रुग्णांच्या हार्टची सर्जरी केली होती. त्यांचाच मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याने जामनगरच्या मेडिकल फॅटर्निटीवर दुःखाची शोककळा पसरली आहे. गांधी यांचा हार्ट अटॅकनेमृत्यू कसा होऊ शकतो? याचा प्रश्न डॉक्टरांना पडला आहे.

गौरव गांधी प्रत्येकाला स्ट्रेस न घेण्याचा सल्ला द्यायचे. ते स्वत:ही स्ट्रेस घेत नव्हते. मग त्यांचा हृदयविकाराने कसा मृत्यू होऊ शकतो? असा सवाल गांधी यांचे नातेवाईक करत आहेत.डॉ. गांधी हे सौराष्ट्रातील लोकप्रिय डॉक्टरांमध्ये गणले जात. रुग्णांना त्यांच्यावर सर्वाधिक विश्वास होता. त्यांनी अवघ्या काही वर्षातच १६ हजार रुग्णांच्या हार्टची सर्जरी करण्याचा विक्रम केला होता. फेसबुकवरून सुरू असलेल्या हाल्ट हार्ट अटॅक या मोहिमेशीही ते संबंधित होते. सोशल मीडिया आणि सेमिनारमधून ते लोकांना हृदयविकारापासून सावध राहण्याचा सल्ला देत होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version