हाथरस प्रकरणातील आरोपींच्या समर्थनार्थ पीडितेच्या घराजवळ घेण्यात आली बैठक

हाथरस, ४ ऑक्टोंबर २०२०: हाथरस मधील ज्या गावात १९ वर्षीय युवतीवर बलात्कार करून तिला मारहाण करण्यात आली होती व उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला त्याच गावात रविवारी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. हाथरस घटनेत अटक झालेल्या आरोपींच्या समर्थनार्थ तथाकथित उच्च जातीच्या लोकांनी आज बैठक घेतली. यावेळी एका आरोपीचं कुटुंबीयही बैठकीला उपस्थित होतं. देशभरात सर्वत्र आरोपींवर कडक कारवाई केली जावी अशी मागणी करण्यात येत आहे. यादरम्यान भाजपा नेते राजवीर सिंग यांच्या घरात ही सभा आयोजित करण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप नेत्याच्या घरी सुरू असलेली बैठक संपली आहे. ही बैठक स्वागतार्ह होती, असं भाजप नेत्यांचं म्हणणे आहे. ते म्हणाले की, ‘सीबीआयच्या तपास पथकाचं स्वागत करण्यासाठी लोक येथे आले आहेत. कोणालाही बोलावलं गेलं नाही.’ आरोपी लवकुशची आईसुद्धा इथं आली. याआधी सकाळी सीडीओ’नं समजावण्याचा प्रयत्न केला होता, परंतु असं असूनही बैठक झाली.

बैठकीच्या आयोजकांपैकी एकानं सांगितले की, “आम्ही पोलिसांना या सभेविषयी माहिती दिली आहे. या युवतीच्या (पीडित) कुटूंबाविरूद्ध एफआयआर दाखल केला जावा. आरोपींना लक्ष्य केलं गेलं आहे.”

यापूर्वी शुक्रवारीही सवर्ण जातीच्या लोकांनी युवतीच्या गावाजवळ बैठक घेतली होती. यावेळी, सवर्ण समाजातील लोकांनी सीबीआय’नं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि निरपराध लोकांना मुक्त करावं अशी मागणी केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा