कोथरुडमधील वीजपुरवठा संदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पाडली

पुणे, २१ ऑक्टोबर २०२०: कोथरुडमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी येत आहेत. यासंदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आ.चंद्रकांत पाटील यांनी सविस्तर चर्चा केली. यावेळी वीजपुरवठा सुरळीत करण्यामधील अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. तसेच गरज पडल्यास अंडरग्राऊंड केबल्ससाठी आमदार निधीतून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिले.

गेल्या अनेक महिन्यांपासून कोथरुड मतदारसंघातील सृष्टी सोसायटी, वात्सल्य नगरी, गुरु गणेशनगर, वृंदावन, मौर्य गार्डन, शांतीबन, एकलव्य परिसर, रोहन गार्डन, सागर कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, भुसारी कॉलनी, परमहंसनगर, रामबाग कॉलनी, डहाणूकर कॉलनी, महात्मा सोसायटी, गांधी भवन, वारजे परिसर आदी भागांत वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून, याबाबतच्या अनेक तक्रारी चंद्रकांत पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात येत आहेत. काही ठिकाणी तर एक फेज लाईट असणे, डीपीचे वारंवार होणारे स्फोट व त्यामुळे होणारा खंडित वीजपुरवठा अशा तक्रारी आल्या आहेत.

या तक्रारींची दखल घेत पाटील यांना महावितरणसोबत आवश्यक तो पत्रव्यवहार करुन पाठपुरावा केला होता. पण या तक्रारी कमी न झाल्यामुळे आज संबंधित सर्व अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन सविस्तर चर्चा करुन त्यांच्या अडचणी या वेळी चंद्रकांत पाटील यांनी जाणून घेतल्या. यावेळी अधिकाऱ्यांनी विभागातील अंडरग्राऊंड केबल्स करणे, नवीन ट्रान्सफार्मर बसवणे आदी कामांसाठी महानगरपालिके तर्फे परवानगी न मिळाल्यामुळे अनेक कामे प्रलंबित असल्याचे त्यांनी ह्या वेळी सांगितले.

महापालिकेतील या विषयासाठी पुढील आठवड्यात मनपा आयुक्त व विद्युत विभाग व महावितरण अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्याची ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

या बैठकीला कोथरुड-पौड रोड विभागाचे महावितरणचे कार्यकारी अभियंता अमित बारटक्के, अतिरिक्त कार्यकारी अभियंता भगवंत सावदे, वारजे विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता गवळी, कोथरुड-बावधन प्रभाग समिती स्विकृत नगरसेवक बाळासाहेब टेमकर आदी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा