पुणे विमानतळावर करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत सिंगापूरहून आलेली एक महिला आढळली पॉझिटिव्ह

पुणे, ३० डिसेंबर २०२२ : पुण्यातून कोरोनासंबंधित धक्कादायक माहिती पुढे आली असून, पुणे विमानतळावर करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. संबंधित प्रवासी सिंगापूरहून आल्याची प्राथमिक माहिती आहे. चीनमध्ये कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील सरकारही अलर्टवर आहे. त्यासाठी सर्व राज्यांना सूचनाही करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये विमानतळावर कोरोना चाचणी ही अनिवार्य करण्यात आली आहे. त्याच दरम्यान, पुण्यातील विमानतळावर एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने राज्यासाठी ही धडकी भरवणारी बातमी आहे.

पुणे विमानतळावर करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत हा प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळाले आहे. या प्रवाशाचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती पालिकेने दिली आहे; तसेच सध्या चिंता करण्याची गरज नसून गेल्या ८-१० दिवसांपासून आपण परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्यास सुरवात केल्याचे पुणे महापालिकेतील सहायक आरोग्य अधिकारी संजीव वावरे यांनी सांगितले.

कोरोना पॉझिटिव्ह आढळलेली व्यक्ती ही ३२ वर्षीय महिला आहे. तिला कोणतीही लक्षणं जाणवत नाहीत. त्यांना सध्या घरातच क्वारंटाइन करण्यात आले आहे, अशीही माहिती संजीव वावरे यांनी दिली.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा