नवी दिल्ली: वाहनधारकांसाठी टोलनाक्यावर फास्टॅग आजपासून बंधनकारक असणार आहे. फास्टॅग हे एक रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाइस आहे. याच फास्टॅगच्या मदतीने आता टोल भरायचा आहे. यामुळे कोणत्याही टोलनात्यावर कॅशमध्ये टोल वसूल केला जाणार नाही. टोल नाक्यावर रविवारपासून फास्टॅग अनिवार्य असणार असून, रस्ते वाहतूक व महामार्ग प्राधिकरणाने शनिवारी त्यासाठी तयारी पूर्ण केली आहे. आता या टोलनाक्यावर रोखीने टोल भरता येणार नाही. ज्यांच्याकडे फास्टॅग नसेल त्यांना दुप्पट पैसे भरावे लागणार आहेत. फास्टॅगमुळे वाहनांच्या लांब रांगा कमी होण्याची शक्यता आहे. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने १५ डिसेंबरपासून ‘फास्टॅग’ सुरू करणार असल्याची अगोदरच घोषणा केली आहे.
तुम्हाला फास्टॅग खरेदी करायचा असेल तर त्याची किंमत १०० रुपये आहे. त्याशिवाय तुमच्या गाडीप्रमाणे वेगळा चार्जही द्यावा लागेल. यासाठी तुम्हाला एसबीआय च्या बँकेत जाऊन पॉइंट ऑफ सेल वर जावं लागेल. इथे तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल. हा फॉर्म भरून के व्हाय सी डॉक्युमेंट्ची फोटोकॉपी द्यावी लागेल. यामध्ये तुमच्या गाडीची अरसी, एक आय डी प्रूफ, अॅड्रेस प्रूफ आणि फोटो द्यावा लागेल.