अब्दुल सत्तारांनी मेडिकल कॉलेजच्या बांधकामासाठी थेट नदी खोदल्याचा आरोप, सत्तार पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

29

औरंगाबाद २१ जून २०२३: महाराष्ट्राचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर १५० कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपाची बातमी ताजी असतानाच त्यांच्यावर पुन्हा एका घोटाळ्याचा मोठा आरोप करण्यात आला आहे. अब्दुल सत्तार यांनी मेडिकल कॉलेजच्या बांधकामासाठी थेट नदीच खोदल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे सत्तारांवरचे आरोपसत्र काही थांबता थांबेना असे दिसतय. .

अब्दुल सत्तार यांनी नदी खोदून वाळू उपसली, अशी तक्रार कोट नांद्रा ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी केली आहे. सरपंचांनी सत्तार यांच्याविरोधात विभागीय आयुक्तालयात तक्रार केली आहे. माणिकराव निकम असे तक्रार करणाऱ्या सरपंचांचे नाव आहे. त्यांच्या या आरोपा प्रकरणी सत्तार यांच्याकडून काय स्पष्टीकरण देण्यात येते ते पहावे लागणार आहे. तसेच या प्रकरणी विभागीय आयुक्तांकडून तक्रारीची दखल घेऊन काही कारवाई केली जाते का? हे देखील पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

कोर्ट नांद्रा गावात पूर्णा नदी आहे. या पूर्णा नदीत पाच हजार ब्रास वाळू उचलण्याचे टेंडर सिल्लोड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने निघाले होते. मात्र त्याठिकाणी पाच हजार ब्रास ऐवजी, तब्बल एक लाख ब्रास वाळू उपसण्यात आलीय, त्यासाठी थेट नदी खोदण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

अब्दुल सत्तार गेल्या काही दिवसांपासून वारंवार विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. त्यांच्यावर शेकडो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप करण्यात आले आहेत. कृषी विभागाकडून, बोगस खतांविरोधात करण्यात आलेल्या धाडसत्रच्या कारवाईवरुनही अब्दुल सत्तार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. या प्रकरणामुळे सुद्धा ते अडचणीत आले होते. यापूर्वी त्यांनी महिला लोकप्रतिनिधीला शिवीगाळ केली म्हणून ते विरोधकांच्या टीकेचे धनी बनले होते. तर या आधीही त्यांच्यावर भ्रष्टाचाराच्या घोटाळ्यांचा आरोप झाला होता. सत्तार यांच्या राजीेनाम्याची देखील मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती. पण या परिस्थितीत देखिल, मुख्यमंत्र्यांकडून अद्याप त्यांचा राजीनामा मागण्यात आलेला नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा