दररोज २२०० चाचण्या घेण्याची क्षमता

मुंबई: आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला असून करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ५११ पर्यंत पोहोचली आहे. महाराष्ट्रात करोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण आहेत. जगभरात या विषाणूमुळे आतापर्यंत १६ हजारपेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. जगभरात साडेतीन लाखापेक्षा जास्त करोना बाधित रुग्ण आहेत. करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि खासगी केंद्रांच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत करोना तपासण्यांची क्षमता १०० हून २२०० पर्यंत वाढविण्यात येत आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सोमवारी दिली.

राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत सध्या केवळ नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील करोना तपासणी करण्यात येते याची क्षमता १०० चाचण्यांची आहे. उद्यापासून मुंबई आणि पुणे येथे नव्याने सुरू होणाऱ्या चाचणी केंद्रांमुळे ६०० चाचण्या करण्याची सुविधा नव्याने निर्माण होणार आहे.

करोना संशयितांची चाचणी करण्यासाठी अधिक चाचणी केंद्रे उपलब्ध व्हावीत, या दृष्टीने वैद्यकीय शिक्षण विभागाने डिपार्टमेंट ऑफ हेल्थ रिसर्च अँड इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडे आणखी केंद्रांना नव्याने मान्यता देण्याची विनंती केली होती. यानुसार मुंबईतील परळ येथील हाफकिन इन्स्टिट्यूट आणि पुण्यातील बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून जनरल रुग्णालय यांना करोना चाचणी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

लवकरच नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच अकोला, धुळे, औरंगाबाद, सोलापूर, मिरज आणि लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेमध्येही तपासणी केंद्रे सुरू होणार आहेत. यापैकी नागपूर येथील तपासणी केंद्राची क्षमता २०० तर अन्य केंद्रांची क्षमता प्रत्येकी १०० आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा