पुणे, दि.२८ मे २०२०: मुंबईहून ऍसिड घेऊन जाणाऱ्या कंटेंनरमधून गळती होऊ लागल्याने चांदणी चौक परिसरातील भुसारी काॅलनीतील नागरिकांना डोळे चुरचुरणे, डोळ्यातून पाणी येणे यांसारखा त्रास होऊ लागला. त्यामुळे तिघेजण बेशुद्ध पडण्याचा प्रकार ही घडला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
बुधवारी( दि.२७)रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास ही घटना घडल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी ताबडतोब अग्निशमन दल आणि पोलिसांना कळवले . त्यानंतर त्वरित अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या.
माती टाकून अॅसिडची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला होता, त्यानंतर रस्ता तात्काळ बंद करून वाहतूक थांबवल्याने पुढील होणारा मोठा अनर्थ टळला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुंबई येथून निघालेला हा टँकर (एम.एच.४६ बी.एम.३७५९) हा नीरा-बारामतीकडे चालला होता. त्यावेळेस एका टँकरमधून गॅस गळती होत असून लोक बेशुध्द पडू लागले आहेत असे आम्हाला कळताच आम्ही घटनास्थळी पोहचून योग्य उपाय योजना केल्या. याबाबत कोथरूड पोलिस ठाण्याच्या वरीष्ठ पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी सांगितले की, ”परिस्थिती नियंत्रणात आहे. अॅसिड सदृश्य गैसची गळती झाली आहे. मात्र, कोणीही बेशुध्द पडल्याची तक्रार वा माहिती आमच्याकडे आलेली नाही. सुरक्षेसाठी रस्त्यावरील वाहतूक रोखली आहे. लोकांच्या डोळ्यांतून पाणी येणे, चुरचुरणे असा त्रास लोकांना सुरू आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी