UNSC ची कारवाई : अब्दुल रहमान मक्की जागतिक दहशतवादी म्हणून घोषित

4

नवी दिल्ली, १७ जानेवारी २०२३ : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) सोमवारी पाकिस्तानमधील दहशतवादी अब्दुल रहमान मक्की याला ISIL अंतर्गत अखेर जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल तीन वर्षांपासून भारत या प्रयत्नात होता. मात्र, चीन संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत याला विरोध करत असल्याने हा प्रस्ताव फेटाळला जात होता. काल १६ जानेवारी रोजी पुन्हा भारताने संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषद समितीत अल-कायदा आणि संबंधित दहशतवाद्यांच्या यादीत मक्कीला प्रतिबंधित करण्याचा प्रस्ताव मांडला होता. अखेर चीनने याला मंजूरी दिल्याने सुरक्षा परिषदेने मक्कीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.

  • मालमत्ता होणार जप्त; प्रवासावर निर्बंध

दरम्यान, अब्दुल रहमान मक्की याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यास चीनने मंजूरी दिल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. सुरक्षा परिषदेच्या ठराव २६१० (२०२१) च्या परिच्छेद १ मध्ये सेट केलेल्या आणि स्वीकारलेल्या धोरणानुसार, त्यांची मालमत्ता गोठवली जाईल तसेच प्रवास निर्बंध आणि शस्त्रास्त्र निर्बंध लादले जातील.

भारत आणि अमेरिकेने आधीच त्यांच्या देशांतर्गत कायद्यांतर्गत मक्कीला दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. तो निधी उभारण्यात, तरुणांना हिंसाचारासाठी भरती करण्यात आणि कट्टरपंथी बनवण्यात आणि भारतात, विशेषतः जम्मू आणि काश्मीरमध्ये हल्ले घडवण्यात गुंतलेला आहे. मक्की हा लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख आणि २६/ ११ चा मास्टरमाइंड हाफिज सईदचा मेव्हणा आहे. यूएस-नियुक्त विदेशी दहशतवादी संघटना लष्करमध्ये त्याने विविध नेतृत्व भूमिका केल्या आहेत. लष्करच्या कारवायांसाठी निधी उभारण्यातही त्यांची भूमिका आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा