श्रीरामपूर,दि. २५ एप्रिल २०२०: श्रीरामूर तालुक्यासह चांडेवाडी, ममदापुर, राजुरी, फत्याबाद भागातील किराणा दुकानदार चढ्या भावाने किराणा मालाची विक्री करत असल्याचे समोर आले आहे.
लॉकडाऊन व संचारबंदीची संधी साधत या भागातील काही किराणा दुकानदार जीवनावश्यक मालाची चढ्या दराने विक्री करीत आहे. यासंबंधी अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या कठिण प्रसंगी प्रशासनाने किराणा दुकानदारांची बैठक घेऊन सर्वसामान्य ग्राहकांची होणारी लूटमार थांबवावी अशी मागणी शिवमल्हार सेनेचे चेतन शिंदे यांनी केली आहे.
आज संपूर्ण देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. जवळपास महिन्याभरापासून लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. याची संधी साधून काही किराणा दुकानदार चढ्या दराने माल विक्री करीत आहेत. सर्व किराणा दुकानात भाव फलक दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. मात्र या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून ग्राहकास हवी असलेली वस्तू न देता दुसऱ्या कंपनीची वस्तू दिली जात आहे.
तसेच किराणा वाहतूक भाड्यात वाढ झाल्याचे अनेक व्यापारी वर्गाकडून दर वाढून येत असल्याने तसेच मालाचा तुटवडा असल्याचे कारणे देत सर्वसामान्य ग्राहकांना वेठीस धरण्यात येत आहे.
वास्तविक सहा महिने धान्य तुटवडा भासणार नाही असे निर्देश अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दिले आहेत. तसेच काळाबाजार तसेच चढ्या दराने विक्री करणाऱ्यांचे परवाने रद्द करण्याबाबत सूचना दिल्या आहेत . येणाऱ्या काळात कोणी काळाबाजार करून व चढ्या दराने मालाची विक्री करीत असल्याच्या तक्रारी आल्यास संबंधित दुकानदारावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा शिव मल्हार सेनेचे श्रीरामपुरचे अध्यक्ष चेतन शिंदे यांनी दिला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: दत्तात्रय खेमनर