ॲड. कृष्णात बोबडे यांचं निधन, टेंभुर्णी शहर बंद ठेऊन वाहिली श्रद्धांजली

माढा (सोलापूर), १४ डिसेंबर २०२०: टेंभुर्णीतील जेष्ठ नेते माढा तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन, टेंभुर्णीचे गटनेते अॕड. कृष्णात आनंदराव बोबडे ( वय ७३ ) यांचं रविवार दि. १३ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पुणे येथील खाजगी रुग्नालयात उपचारादरम्यान निधन झालं. त्यांच्यावर सोमवारी सकाळी दहा वाजता नगोर्ली रोडच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्वच क्षेत्रातील नागरीक उपस्थित होते.

कृष्णात बोबडे हे दादा व बोबडे मालक या नावानं परिचयाचे होते. मागील ४० वर्षापासून टेंभुर्णी शहरात राजकारणात सक्रीय होते. त्यांनी टेंभुर्णी शहराचे सरपंच, पंचायत समीती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समीतीचे संचालक, साखर कारखान्याचे संचालक व माढा तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन म्हणून वीस वर्ष काम पाहिलं आहे. त्यांच्या राजकारण व समाजकारणातील अनुभवामुळं पंचक्रोशीतील नागरीक त्यांच्याकडं विविध समस्या, भांडण तंटे यासह अनेक प्रकारचे वाद मिटवण्यासाठी येत होते. त्यांच्या शब्दाला मान होता.

त्यांच्या निधनानं टेंभुर्णीचा आधारवाड हरपल्याची भावना नागरीकांत आहे. रविवारी निधनाची वार्ता फेसबुक, व्हॉटसॲपवरुन वाऱ्यासारखी पसरली. आज सोमवारी टेंभुर्णी शहरातील व्यापाऱ्यांनी १०० दुकानं बंद ठेऊन बोबडे यांना श्रद्धांजली वाहिली. तर टेंभुर्णी ग्रामपंचायत कार्यालयात पंचायतीच्या वतीनं सरपंच, उपसरपंच यांच्यासह सदस्यांनी श्रद्धांजली वाहीली. त्यांना त्यांच्या पश्चात दोन भाऊ, सात बहिणी, तीन मुलं, एक मुलगी, पुतने असा मोठा परिवार होता. भाजपाचे माढा तालुकाध्यक्ष योगेश बोबडे यांचे ते वडील होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा