आंध्र प्रदेश, 14 जून 2022: आंध्र प्रदेशमध्ये PUBG गेम खेळताना हरल्यानंतर एका मुलाने निराश होऊन पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. त्या मुलाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. हे प्रकरण आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणम जिल्ह्यातील आहे, जिथे 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने PUBG गेम खेळत असताना हरल्यानंतर आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.
असं सांगितलं जात आहे की, मुलगा उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी वडिलांसोबत नातेवाईकांच्या घरी आला होता. त्याचे आई-वडील गेल्या अनेक वर्षांपासून वेगळे राहत असल्याने मुलाने वडिलांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्याच्या मृत्यूनंतर आई खूप अस्वस्थ आहे आणि तिच्या वतीने CrPC कलम 174 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याचवेळी, या प्रकरणाबाबत पोलिसांनी सांगितलंय की, 11 जून रोजी हा मुलगा त्याच्या भावांसोबत PUBG खेळला होता. पण नंतर गेम खेळत असताना हरल्यानंतर भावांनी त्याला चिडवण्यास सुरुवात केली.
आपल्या मुलाला अस्वस्थ पाहून वडिलांनी त्याला गेम खेळण्यास मनाई केली, यामुळे तो मुलगा आणखी निराश झाला. त्यानंतर घटनेच्या दिवशी रात्री जेवण करून मुलाने खोलीचा दरवाजा बंद केला. रविवारी सकाळी वडिलांनी दरवाजा ठोठावला असता आवाज आला नाही बराच वेळ वाट पाहिल्यानंतर तो दरवाजा तोडला असता खोलीत मुलाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
आंध्र प्रदेशापूर्वी लखनौ मधील पब्जी प्रकरण चर्चेत आहे. ऑनलाइन गेम खेळण्यापासून रोखल्यामुळं एका 16 वर्षीय मुलाने त्याच्या आईची हत्या केली. अल्पवयीन मुलाने वडिलांच्या रिव्हॉल्वरने आईवर गोळी झाडली. त्यानंतर त्याने आईचा मृतदेह तीन दिवस एका खोलीत लपवून ठेवला. धाकट्या बहिणीला घाबरवून मित्रांसोबत मजा केली. मात्र ही घटना उघडकीस येताच वडील तर चक्रावून गेले आणि पोलिसांनाही धक्का बसला. तरीही त्या प्रकरणी अल्पवयीनांकडून प्रश्न विचारण्याची प्रक्रिया सुरू आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे