महाराष्ट्रा नंतर आता बिहारमध्ये बंडखोरी पॅटर्न ?

नवी दिल्ली, ४ जुलै २०२३ : महाराष्ट्रातील मोठ्या राजकीय उलथापालतीचे पडसाद देशभरात उमटले. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधी पक्षातील नेते एकत्र आले. बिहारमधील पाटण्यात त्यांनी मोदीविरोधात एल्गार पुकारला. यातून राहुल गांधी यांना विरोधकांचे नेतृत्व देण्याचे स्पष्ट संकेत दिले. या गोष्टीला काही दिवस जात नाहीत तोच, भाजपने महाराष्ट्रात भूकंप घडवून विरोधकांना मोठा झटका दिला. आता या आघाडीची मोट बांधणाऱ्या नितीश कुमार यांच्या गडात सुरुंग लावल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा पॅटर्न बिहारमध्ये होणार का ?, अशा चर्चांनी जोर धरला आहे.

सध्या सोशल मीडियापासून राजकीय वर्तुळात पुढचा भूकंप बिहारमध्ये होणार असल्याची चर्चा रंगली आहे. राजकीय विश्लेषकापासून काही नेत्यांनाही हीच शक्यता वाटत आहे. जनता दल युनायटेड आणि राष्ट्रीय लोक दल यांच्या सरकारमागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा सुरु झाला आहे. त्यामुळे पक्षातून कोण बंड करेल याची चाचपणी करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीमुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार सतर्क झाले आहेत. त्यांनी पक्षाच्या आमदार, खासदारांसोबत खास बैठक घेतली. त्यात समोरासमोर बोलणी केली. महाराष्ट्रातील घडामोडींचा धडा बिहारमध्ये गिरवू नये, यासाठी मोर्चे बांधणी सुरु करण्यात आली आहे. आता विरोधी गटाने रणशिंग फुंकले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती सुरु असतानाच महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला.

नितीश कुमार यांनी दोन जुलैपासूनच आपल्या निवासस्थानी खासदार आणि आमदारांच्या बैठकींचे सत्र सुरु केले आहे. नितीश कुमार यांनी खासदार चंदेश्वर प्रसाद चंद्रवंशी, दुरल चंद्र गोस्वामी, सुनील कुमार कुशवाहा आणि राज्यसभेचे खासदार अनिल हेगडे यांच्याशी चर्चा केली.

बिहार विधानसभेच्या महाराष्ट्राखालोखाल २४३ जागा आहेत. यापैकी ४५ आमदार नितीश कुमार यांच्या जनता दल संयुक्त या पक्षाचे आहेत. तर लोकसभेत जदयुचे एकूण १६, तर राज्यसभेत एकूण ५ खासदार आहेत. कोणते नेते भाजपच्या गळाला लागले आहेत, तिथे ऑपरेशन लोट्स कसे होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागेल आहे. पण अनेक जण नितीश कुमार मात देतील, असा दावा करत आहेत. दरम्यान नितीश कुमार यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतली.

लोजदचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांनी या घडामोडीपूर्वीच मोठा बॉम्ब टाकला. पहिली फूट जेडीयूमध्ये नाही तर काँग्रेस पक्षात पडेल, असा दावा त्यांनी केला. तसेच नितीश कुमार सध्या पक्ष वाचविण्यासाठी केविलवाणी धडपड करत असल्याचा आरोप त्यांनी केला. जनता दल संयुक्तचे काही आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत आहे. अर्थात या बैठक सत्रावर तात्काळ जदयू कडून स्पष्टीकरण देण्यात आले. मुख्यमंत्री नितीश कुमार केवळ समस्या आणि अडचणी जाणून घेत असल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा