मंडप उभारण्यास परवानगी द्या, गणेश उत्सव समितीची मागणी

9

पुणे, १४ ऑगस्ट २०२०: गणेशोत्सव म्हटलं की पुण्यातील रस्त्यावर गणेश मंडळांनी घातलेले मांडव आणि त्यातील मनमोहक देखावे. गणपतीच्या दिवसांमध्ये दहा दिवस पुण्यामध्ये प्रचंड गर्दी असते. परंतु, यंदा या सर्व गोष्टींपासून पुणेकरांना वंचित रहावे लागणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे यंदा गणेश उत्सवावर चांगलाच परिणाम होताना दिसत आहे. एक तर न्यायालयातील सूचनांमुळे गणेश उत्सवावर अनेक प्रतिबंध लागले होते त्यात यंदा कोरणामुळे गणेशोत्सवच साजरा होईल की नाही असे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

कोरोनामुळे आता चौकाचौकात मांडव घालता येणे शक्‍य होणार नाही कारण त्यामुळे गर्दी वाढण्याची शक्यता आहे. यावर नाराजी व्यक्त करत पुण्यातील गणेश मंडळांनी अशी मागणी केली आहे की, ज्या मंडळांकडे मंदिर नाहीत अशा मंडळांसाठी श्रींची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यापुरता मांडव घालण्याची परवानगी देण्यात यावी. यासंदर्भात काल १३ ऑगस्ट रोजी पुणे शहर गणेशोत्सव समितीच्या वतीने शुक्रवार पेठेतील लाड सुवर्णकार धर्मशाळेत बैठक घेण्यात आली. यात ही सामूहिक मागणी करण्यात आली.

ह्याबाबत गणेश उत्सव समितीने अशी भूमिका मांडली की, “मंदिरामध्ये आधीच एक मूर्ती प्रतिष्ठापित केलेली असते. त्याजागी आणखीन एक मूर्ती लावल्याने मंदिरांमध्ये गर्दी होईल. तसेच नागरिक देखील मंदिराच्या छोट्या भागामध्ये गर्दी करण्यास सुरुवात करतील. याला पर्याय म्हणून रस्त्यावर मांडव टाकण्यास परवानगी देण्यात यावी जेणेकरून दुसरी मूर्ती मांडवात बसवता येईल व जागा मोठी असल्याने गर्दी देखील टाळता येईल. महत्त्वाचं म्हणजे सजावट केली जाणार नाही. अभिषेक, पूजा, आरती असे धार्मिक विधी भाविकांना केवळ ऑनलाइन पद्धतीने पाहता येतील. उत्सव बंदिस्त जागेऐवजी खुल्या जागेत करणे सुरक्षित आहे.”

अनधिकृत गणेश विक्री स्टॉलवर कारवाईचे आदेश

गणेशोत्सव येत आहे त्या कारणाने नागरिकांनी रोडवर गर्दी करू नये म्हणून पुणे महानगरपालिका सातत्याने खबरदारी घेत आहे. गणेशोत्सव जवळ आला आहे त्यामुळे आता रस्त्याच्या कडेला मांडव टाकून गणेश मूर्तींची विक्री सुरू होत आहे. परंतु, यामुळे रस्त्यावर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा रस्त्याच्या दुतर्फा टाकण्यात आलेल्या गणेश विक्रीच्या मांडवावर कारवाई करण्याचे आदेश पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहेत. तसेच त्याला पर्यायी जागा म्हणून महानगरपालिकेच्या शाळांमधील रिकामे वर्ग मोफत देण्यात येतील असे देखील सूचित केले.

विसर्जनासाठी फिरता हौद..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात गणेश विसर्जनासाठी फिरते विसर्जन हौद तयार करण्यात येणार आहेत. तसेच मूर्तीदान करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयानुसार व्यवस्था केली जाणार आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. ज्या नागरिकांना घरी विसर्जन करणे गैरसोयीचे आहे. त्या नागरिकांसाठी या फिरत्या विसर्जन हौदाची व्यवस्था केली जाणार आहे.


न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा