पुण्यातील ऐक्य कलाविष्कार संस्थेचा उपक्रम, ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन

10

पुणे १८ जून २०२३: ऐक्य कलाविष्कार संस्थेतर्फे, आज रविवार दिनांक १८ जून २०२३ रोजी सकाळी आंबेगाव पठार येथील ‘कपिल कॅपिटल’ सोसायटीमध्ये तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी चक्कर येण्याचे त्रास, तोल जाणे तसेच कानावरील विकारांवर वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. सदर तपासण्या ह्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

पुण्यातील ऐक्य कलाविष्कार संस्था नेहमीच आपल्या नवनवीन उपक्रमांसाठी ओळखली जाते. मग ते नवोदित कलाकारांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणे असो किंवा सामाजिक कार्य असो. कोरोना सारख्या महामारीच्या काळात पांडुरंगाच्या भक्तांसाठी सोसायटीमध्ये कीर्तन – भजनाचे आयोजन करणे असो वा गरजूंना कपडे देऊन छोटीशी मदत करणे असो. असे एक ना अनेक उपक्रम हे ऐक्य कलाविष्कार आणि संस्थेच्या कलाकारांकडून नेहमीच केले जातात.

आंबेगाव पठार परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी ह्या मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराला मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावून या शिबिराचा लाभ घेतला. स्थानिकांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल ऐक्य कलाविष्कार चे संस्थापक-अध्यक्ष श्री.धनंजय अरविंद गवळी यांनी सर्वांचे आभार मानले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.