हडपसर, १० फेब्रुवारी २०२३ : हडपसर परिसरातील एका चारमजली इमारतीवर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी बांधकाम विभागाने गुरुवारी कारवाई केली. यामुळे इतर अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. माळवाडी येथील चारमजली इमारतीवर महापालिकेने जेसीबी मशीनच्या साह्याने कारवाई करीत इमारत पाडण्यात आली आहे.
भाजीमंडईच्या शेजारी दुकानदारांच्या तीन हजार स्क्वेअर फुटांच्या पत्र्याच्या दुकानावरही कारवाई करण्यात आली. यावेळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हडपसर- मालवाडी रोडवरील सर्व्हे नंबर २०९, ओरिएंट गार्डनशेजारी पार्किंगसह चारमजली अनधिकृत बांधकाम होत असल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बांधकाम थांबविण्याची नोटीस दिली होती.
मात्र, या इमारतीचे मालक शैलेश तुपे यांनी महापालिकेच्या नोटिशीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे बांधकाम विभागाने काल दुपारी जेसीबी मशीनच्या साह्याने पोलिस व कर्मचारी यांच्या उपस्थितीत कारवाई केली. यानंतर हडपसर गावातील भाजीमंडईच्या शेजारील रस्त्यावरील दुकानांवरही जेसीबी मशीनच्या साह्याने कारवाई करण्यात आली. वाहतुकीला अडथळा ठरणारी ही पत्र्याची दुकाने येथून हटविण्यात आली. ही कारवाई पालिकेचे बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता युवराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता रमेश काकडे व शाखा अभियंता विजय दाभाडे यांनी केली आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर