हाथरस, ६ ऑक्टोंबर २०२०: यूपीमतील हाथरसमधील घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर सातत्यानं आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याचबरोबर, सरकार असंही म्हणते आहे की, परकीय निधीतून जातीय दंगली भडकावण्याचा युपीमध्ये कट रचला जात आहे. या सर्व प्रकारात, या घटनेवर दलित वर्ग एकत्रित होत असताना दुसरीकडं काही संघटनाही आरोपींच्या बाजूनं जाताना दिसत आहेत.
या प्रकरणातील ताज्या माहितीनुसार निर्भया प्रकरणातील सर्व बलात्कारितांचा खटला लढवणारे वकील एपी सिंह आता हाथरस प्रकरणातील आरोपीच्या वतीनं वकील म्हणून केस लढवणार आहेत. अखिल भारतीय क्षत्रिय महासभेनं आरोपींच्या वकिलांसाठी एपी सिंह यांची वकील म्हणून नेमणूक केली आहे.
माजी केंद्रीय मंत्री राजा मानवेंद्र सिंह यांच्या वतीनं एपी सिंह यांना हाथरस आरोपींचा खटला लढायला सांगण्यात आलं आहे. अखिल भारतीय क्षत्रिय महासभा पैसे गोळा करेल आणि वकील ए.पी. सिंग यांची फी भरेल असं मानवेंद्र सिंह यांनी पत्रात म्हटलं आहे.
या पत्रात असं म्हटलं आहे की, हाथरस प्रकरणातून उच्चवर्णीय समाजातील एससी-एसटी कायद्याचा दुरुपयोग करुन त्यांची बदनामी केली जात आहे, ज्यामुळं खासकरुन राजपूत समाजाला इजा झाली आहे. या माहितीनुसार हाथरस प्रकरणातील आरोपींच्या कुटूंबाच्या वतीनं एपी सिंह यांना बाजू मांडण्यास सांगितलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे