सिस्टमला बरबाद करत आहेत पंतप्रधान मोदी: राहुल गांधी

पंजाब, ६ ऑक्टोंबर २०२०: पावसाळी अधिवेशनात संसदेनं पारित केलेल्या कृषी कायद्यांबाबत काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष केंद्र सरकारला कडाडून विरोध करीत आहेत. काँग्रेस आजकाल पंजाबमध्ये ट्रॅक्टर दौरा करीत आहे, ज्यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधीही सहभागी होत आहेत. सोमवारी पंजाबमधील भवानीगड ते सामना यादरम्यान ट्रॅक्टरचा प्रवास सुरू झाला.

शेती वाचवा ही आपली मोहीम सुरू करण्याआधी राहुल गांधी यांनी पंजाब मधील एका सभेला संबोधित देखील केलं. राहुल गांधींनी आपल्या भाषणात केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले, “६ वर्षांपासून हे सरकार एकामागून एक गरीब, मजूर आणि शेतकर्‍यांवर हल्ले करीत आहे. त्यांच्या धोरणांवर नजर टाकली तर असं कोणतंही धोरण नाही ज्यामुळं गरीब लोकांना फायदा होईल.”

राहुल गांधी म्हणाले, “नोटबंदी नंतर जीएसटी आणलं गेलं, आता तुम्ही कुठल्याही छोट्या दुकानदाराला किंवा छोट्या व्यावसायिकाला विचारा की जीएसटीमुळे काय फायदा झाला. कोणतेही छोटे व्यवसायिक किंवा दुकानदार यामुळं कोणते फायदे झाले किंवा जीएसटी काय आहे हे देखील सांगू शकणार नाही.”

कोरोना कालावधीत भेडसावणाऱ्या समस्या उपस्थित करीत राहुल गांधी म्हणाले, “कोरोनाच्या काळात आम्ही नरेंद्र मोदींना गरिबांना, भुकेल्या कामगारांना हजारो किलोमीटर चालत असलेल्यांना मदत करण्यास सांगितलं. आम्ही म्हटलं होतं की छोट्या व्यापाऱ्यांना मदत करा पण मोदी जिने अद्याप कोणतंही पाऊल उचललं नाही.”

कोणत्या गोष्टीची घाई होती: राहुल गांधी

शेतकऱ्यांना उद्देशून राहुल गांधी म्हणाले, “मला तुम्हाला विचारायचं आहे की या संकटाच्या काळातच कृषिविषयक हे तीन कायदे आणण्याची काय गरज होती? काय घाई होती? कारण यासाठी की मोदीजी जाणून आहेत की शेतकरी किंवा मजुरांच्या पोटावर कुऱ्हाड चालवल्यावर तो घरातून बाहेर पडणार नाही. नरेंद्र मोदी या व्यवस्थेला नष्ट करू इच्छित आहेत. त्यांनी एमएसपी’ची हमी दिली पाहिजे, तर हे न करता ते मजूर व शेतकऱ्यांना उपाशी मारण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांचा गळा कापण्याचा प्रयत्न करत आहेत ”

केंद्र सरकारविरूद्ध हल्ले सुरू ठेवत राहुल गांधी म्हणाले, “शेतकऱ्यांकडे दोनच पर्याय असतील – अदानी किंवा अंबानी. आता मला सांगा की शेतकरी त्यांच्याशी लढा देऊ शकेल का? ते त्यांच्याशी बोलू शकतात का? नक्कीच प्रत्येक शेतकरी त्यांच्याशी शेतीचे हमीभाव पाडून व्यवहार करू शकणार नाही. मोदीजी हे सगळं संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी येथे फक्त शेतकरी आणि कामगारांसाठी नाही तर संपूर्ण भारतातील लोकांसाठी उभा आहे. कारण, नुकसान फक्त शेतकरी किंवा कामगारवर्गाचेच नाही तर संपूर्ण देशाचं होणार आहे. ”

राहुल गांधी म्हणाले, “काँग्रेस पक्ष आता माघार घेणार नाही. मोदी जी तुम्हाला शेतकरी-मजुरांची शक्ती काय आहे हे समजून घ्यावी लागेल, कोरोनाच्या भीतीनं ते आता घरी बसणार नाहीत, परंतु आता रस्त्यावर धडक देतील, तुमच्या सरकारविरूद्ध लढा देतील.” आणि हे कायदे रद्द करून दाखवतील. ”

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा