Pune Flower Market License Controversy: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फूल बाजारात परवाना वाटपावरून नवा वाद उफाळला आहे. बाजार समिती प्रशासनाने प्रतीक्षा यादीतील जुन्या अडतदार आणि व्यापाऱ्यांना डावलून ५६ नवीन परवाने वितरित केल्याचा आरोप शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते तथा व्यापारी संघाचे अध्यक्ष आप्पा गायकवाड यांनी केला आहे. हे परवाने तात्काळ रद्द करून, १९९० पासून फुलांच्या व्यापारात असलेल्या प्रतीक्षा यादीतील अडतदारांना प्राधान्य देण्याची मागणी गायकवाड यांनी केली आहे.
गायकवाड यांनी यासंदर्भात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, “आम्ही १९९० पासून फुलांच्या व्यापारासाठी जागेची मागणी करत आहोत, मात्र संचालक मंडळाने प्रतीक्षा यादीकडे दुर्लक्ष करत आपल्या नातेवाईकांना जागा वाटप केल्या आहेत.” पणनमंत्र्यांनी नवीन फूल बाजार १०० दिवसांत सुरू करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते अद्यापही अपूर्ण असल्याचे गायकवाड यांनी अधोरेखित केले. येत्या महिन्यात गाळ्यांचे वाटप न झाल्यास, लोकशाही मार्गाने फुलांच्या बाजारावर ताबा घेऊन व्यापार सुरू केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
याच दरम्यान, व्यापारी शिष्टमंडळाने समितीचे अधिकारी मंगेश पठारे यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यामध्ये, १९९० पासून फुलांच्या बाजारात व्यवसाय करणाऱ्या अडतदारांना नवीन फूल बाजारात लवकर जागा उपलब्ध करून देऊन तो बाजार त्वरित सुरू करण्याची आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची मागणी प्रमुख होती.
अडतदारांना त्यांच्या व्यापारासाठी पुरेशी जागा उपलब्ध करून त्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या प्रकरणामुळे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील वातावरण चांगलेच तापले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे
