१२ आमदार नियुक्ती: मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या भेट

विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.  त्यांच्यासोबत महाविकासआघाडीचे प्रमुख नेते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले होते. विधानपरिषदेच्या १२ आमदार नियुक्ती बाबत आम्ही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना विनंती केली आहे. या नावांचा ठराव पाठवून बराच कालावधी झाला आहे. त्यामुळे तातडीने निर्णय घ्या, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा कित्येक महिन्यांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे, या भेटीनंतर तरी तोडगा निघणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
 परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागा रिक्त असून अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांना १२ नावांची यादी दिली होती. मात्र अनेक महिने उलटले तरी यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कुठलीही कार्यवाही केली नाही. ६ नोव्हेंबर २०२० ला नवाब मलिक, अनिल परब आणि अमित देशमुख यांनी १२ नावे राज्यपाल यांना भेटून सुपूर्त केली होती. तर त्याच्या दोन आठवडे आधी २९ ऑक्टोबर २०२० ला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत १२ नावे मंजूर करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेकडून प्रत्येकी चार जणांची शिफारस करण्यात आली होती.
काँग्रेसकडून
१) सचिन सावंत
२) रजनी पाटील
३) मुजफ्फर हुसैन
४) अनिरुद्ध वणगे – कला
राष्ट्रवादी काँग्रेसकडून
१) एकनाथ खडसे
२) राजू शेट्टी
३) यशपाल भिंगे – साहित्य
४) आनंद शिंदे – कला
शिवसेना उमेदवार
१)उर्मिला मातोंडकर
२) नितीन बानगुडे पाटील
३) विजय करंजकर
४) चंद्रकांत रघुवंशी
“१२ आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपालांना विनंती केली आहे. अपेक्षा आहे की ते लवकर निर्णय घेतील.”, असं काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. दुसरीकडे “राज्यपालांना राज्यात काय सुरू आहे त्याची माहिती दिली जाते, तर सध्या पावसाबद्दल, धरण स्थिती बद्दल माहिती दिली, चर्चा केली. शिफारस केलेल्या १२ नावांबद्दल निर्णय घ्यावा अशी विनंती केली”, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा