कर्जत/जामखेड, १५ फेब्रुवारी २०२३ : सातत्याने विद्यार्थांच्या प्रश्नांवर आवाज उठविणारे ‘राष्ट्रवादी’चे युवा आमदार रोहित पवार यांची राज्य विधानमंडळाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीचे विद्यार्थ्यांकडून स्वागत होत आहे.
आमदार रोहित पवार यांनी शासनाकडे वेळोवेळी विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडून ते सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. ‘एमपीएससी’ची परीक्षा बहुपर्यायी न होता ‘यूपीएससी’च्या धर्तीवर वर्णनात्मक पद्धतीने होणार आहे; परंतु हा निर्णय लगेच लागू न करता २०२५ पासून लागू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी होती. यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. याप्रश्नी आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बाजू मांडली होती.
राज्य शासनाने त्यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘सिनेट’वर नियुक्ती केल्याने पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील कार्यक्षेत्रात शैक्षणिक प्रश्न सोडविण्याची संधी मिळाली आहे. याबाबतचे पत्र विधानमंडळ सचिवालयाने नुकतेच त्यांना दिले आहे. आमदार रोहित पवार यांच्यासह भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांचीही ‘सिनेट’वर नियुक्ती झाली आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर