आसाराम यांनी जामिनासाठी केला अर्ज, कोर्टाची सुनावणीस सहमती

जोधपुर, २४ नोव्हेंबर २०२०: लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली तुरूंगात असलेले आसाराम बापूंच्या जामीन याचिकेवर सुनावणी करण्याची याचिका जोधपूर कोर्टानं मान्य केली आहे. जानेवारीच्या तिसर्‍या आठवड्यात आसाराम यांच्या अर्जावर सुनावणी होईल. वयाचं कारण देत युक्तिवाद करत आसाराम यांनी कोर्टात सुनावणीसाठी बाजू मांडली.

न्यायमूर्ती संदीप मेहता आणि रामेश्वरलाल व्यास यांच्या खंडपीठानं आसाराम यांची याचिका मान्य केली आहे. आसाराम म्हणाले की ते ८० वर्षांचे आहेत आणि २०१३ पासून तुरूंगात आहेत. त्यांची अपील लवकरच सुनावण्यात यावी अशी आसारामनं कोर्टाला सांगितलं. आसाराम यांचा अर्ज ज्येष्ठ वकिल जगमाल चौधरी आणि प्रदीप चौधरी यांनी सादर केला.

२०१३ साली जोधपूर जवळील मनाई आश्रमात एका अल्पवयीन मुलीनं आसारामवर बलात्काराचा आरोप केला होता. आसारामला ३१ ऑगस्ट २०१३ रोजी मध्य प्रदेशातील इंदोर येथून अटक करण्यात आली होती. आसाराम यांच्यावर पोस्को, किशोर न्याय कायदा ( जुवेनाइनल जस्टिस एक्ट), बलात्कार, गुन्हेगारी कट रचणं यांसारखे इतर अनेक गुन्हे दाखल आहेत.

२०१४ मध्ये आसाराम यांनी सर्वोच्च न्यायालयात जामीन याचिका दाखल केली होती, जी कोर्टानं फेटाळली होती. एप्रिल २०१८ मध्ये जोधपूर विशेष कोर्टानं आसाराम यांना अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याबद्दल दोषी ठरवलं. पोक्सो कायद्यानुसार कोर्टानं आसाराम यांना जन्मठेपेची शिक्षा (मृत्यूपर्यंत) आणि एक लाख रुपयांचा दंड ठोठावला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा