Devotee Rescued from Indrayani River Flood in Alandi: तीर्थक्षेत्र आळंदीत सध्या वरुणराजाचं रौद्ररूप पाहायला मिळत आहे. संततधार पावसामुळे इंद्रायणी नदी दोन्ही काठ तुडुंब भरून वाहत आहे, ज्यामुळे नदीकाठी आषाढी वारी प्रस्थान सोहळ्यासाठी जमलेल्या लाखो भाविकांमध्ये काही काळ चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. याच दरम्यान एक धक्कादायक घटना घडली, ज्यात इंद्रायणीच्या प्रवाहात एक भाविक वाहून गेला.
मात्र, सुदैवाने प्रशासनाच्या तत्परतेमुळे त्याचा जीव वाचला. मिळालेल्या माहितीनुसार, इंद्रायणीच्या जोरदार प्रवाहामुळे हा भाविक जुन्या पुलापर्यंत वाहत गेला. परंतु, त्याने प्रसंगावधान राखत पुलाशेजारील एका झाडाला घट्ट पकडलं. ही बाब निदर्शनास येताच आळंदी नगरपरिषद आणि एनडीआरएफच्या पथकाने तातडीने बचावकार्य सुरू केलं.
अत्यंत शिताफीने या पथकांनी भाविकाला सुरक्षितपणे पाण्याबाहेर काढत त्याला जीवदान दिलं. त्यानंतर, संबंधित भाविकाला तातडीने रुग्णवाहिकेतून आळंदी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
आळंदीसह संपूर्ण इंद्रायणीच्या पाणलोट क्षेत्रात, विशेषतः मावळ आणि लोणावळा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे इंद्रायणी नदीचे पात्र दुथडी भरून वाहत असून, आळंदीतील भक्ती सोपान पूल आणि भक्त पुंडलिक मंदिरही पाण्याखाली गेलं आहे. त्रिवेणी भागीरथी कुंडाच्या दगडी घाटावरही पुराचं पाणी आल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.
या पार्श्वभूमीवर, नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी भाविकांना इंद्रायणी नदीत न जाण्याचं आवाहन केलं होतं. तरीही काही भाविक सूचनांचं पालन न करता स्नानासाठी नदीत उतरताना दिसत आहेत.
प्रशासनाने गंभीर इशारा दिला आहे की, जर पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर भाविकांच्या सुरक्षेसाठी इंद्रायणीकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात येतील. यामुळे भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून स्वतःची आणि इतरांची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे










































